साहित्यांचे दर स्थिर असल्याने पालक समाधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:01 AM2018-05-30T00:01:27+5:302018-05-30T00:01:27+5:30
शहरातील बाजारपेठ सध्या शैक्षणिक साहित्याने बहरली असून, वस्तूंचे दर स्थिर आहेत. जीएसटी, नोटाबंदी आदी कारणांमुळे वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य यांचे दर वाढण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने दर मागील वर्षीसारखेच असल्याने पालकवर्गाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
नाशिक : शहरातील बाजारपेठ सध्या शैक्षणिक साहित्याने बहरली असून, वस्तूंचे दर स्थिर आहेत. जीएसटी, नोटाबंदी आदी कारणांमुळे वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य यांचे दर वाढण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने दर मागील वर्षीसारखेच असल्याने पालकवर्गाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यावर्षी पहिली, आठवी आणि दहावीचा अभ्यासक्रम बदलला असून, यातील दहावीची सर्व पुस्तके बाजारात आलेली आहेत. शाळा, क्लासेस लवकर सुरू होणार असल्याने त्यांची आगाऊ खरेदी करण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला आहे. आठवीची काही पुस्तके बाजारात आली आहेत, तर काही येत्या दहा दिवसांत येण्याची शक्यता आहे. नववीचाही थोड्या प्रमाणात अभ्यासक्रम बदलला आहे. अर्थात शाळांमधून पुस्तके मोफत दिली जात असल्याने दुकानांमध्ये पुस्तकांना फारसा प्रतिसाद नाही. पण काही विद्यार्थी व पालक पुस्तके विकत घेण्यावर भर देत असल्याने त्यांच्याकडून खरेदी सुरू आहे. दप्तर, वॉटरबॅग, डबे, कंपास पेटी, बूट, सॉक्स, वह्या, रेनकोट आदींसह सर्वच शैक्षणिक साहित्यात यंदा वैविध्यपूर्ण प्रकार पाहायला मिळत असून, बच्चेकंपनीची आवड लक्षात घेत त्यात निर्मात्यांनी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. शाळांमधून मिळणारे गणवेश तसेच ठराविक दुकानातून गणवेश, बूट आणि स्पोर्टसचे ड्रेस घेण्यासाठी सक्ती केली जात असून या गणवेशाची किंतम वाजवीपेक्षा अधिक असल्याचे पालकवर्गाने बोलून दाखविले. दोन दोन जोड घेण्याची सक्ती देखील केली जात आहे.
साधारणत: १५ जूनपासून शाळा सुरू होणार असून, जूनमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदीचा एकदम आर्थिक बोजा पडायला नको म्हणून अनेक पालक मे महिन्यामध्येच थोडीफार खरेदी उरकून घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे मेनरोडसह उपनगरातल्या सर्व बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. मुले आपल्या आवडीचे कार्टून चित्र, आवडीचे रंग असणाऱ्या वस्तूंचा हट्ट धरत आहेत, पालक किंमत, टिकाऊपणा व मुलांची आवड यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकूणच मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यापासून साहित्य खरेदीला ग्राहकांची झुंबड उडण्याची शक्यता आहे. दप्तरांमध्ये नेहमीच्या प्रकारांबरोबरच ‘५०० बाय ५०० डेनिअर मटेरियल’, लाईट वेट प्रकार आलेले आहेत. याशिवाय यंदाही ट्रॉली स्कूलबॅगला मागणी आहे. दप्तरांबरोबरच रेनकव्हरलाही मागणी आहे. याशिवाय टिफीनबॅग, वॉटरबॅग, डबे, कंपास पेटी, बूट, सॉक्स, वह्या, रेनकोट यांच्यातही भरपूर प्रकार आलेले आहेत. ट्रॉली बॅग ९०० ते १५०० रु., पेन्सिल पाऊच १० ते ३०० रु., रेनकव्हर ४० ते ३०० रुपये, टिफीन बॅग १५ ते ३०० रुपये आदि दरांमध्ये उपलब्ध आहेत.