पालकांनी मुलांच्या कल्पकतेचे समर्थन करणे गरजेचे
By admin | Published: March 25, 2017 11:55 PM2017-03-25T23:55:02+5:302017-03-25T23:55:21+5:30
नाशिक : उद्योग व व्यवसायात प्रगती साधण्यासाठी योग्य क्षेत्राची निवड करून त्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी नव उद्योजकांनी धेय्याप्रती एकाग्र होऊन प्रयत्न केले पाहिजे, असे मतशंतनु गुणे यांनी केले.
नाशिक : उद्योग व व्यवसायात प्रगती साधण्यासाठी योग्य क्षेत्राची निवड करून त्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी नव उद्योजकांनी धेय्याप्रती एकाग्र होऊन प्रयत्न केले पाहिजे, असे मत सृजन क न्सल्टंटचे संस्थापक शंतनु गुणे यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात रस आहे, याची जाणीव करून घेत आई-वडिलांनीही पाल्यांच्या कल्पकतेला व व्यावसायिक निर्णयाला पाठबळ देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शंकाराचार्य न्यास येथील डॉ. कुर्तकोटी सभागृहात ‘करिअरच्या अलीकडे आणि पलीकडे’ चर्चासत्रात विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना ते शनिवारी (दि.२५) बोलत होते. याप्रसंगी गुणे म्हणाले, एकीकडे शैक्षणिक जीवनात दहावीनंतर पालकांना त्यांच्या पाल्यांना कोणत्या शाखेत पाठवायचे, असा प्रश्न पडतो, तर दुसरीकडे या वयातील अनेकजण यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचे सामर्थ्य सिद्ध करीत आहेत. कारण अशा मुलांनी घेतलेल्या निर्णयाला त्यांच्या पालकांनी पूर्णपणे विश्वासार्हता दाखवित पाठिंबा दिलेला असतो. असाच समर्थन सर्व पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या मागे खंबीरपणे उभे केले, तर नव्या पिढीतील उद्योजकात नक्कीच वाढीला लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अशाचप्रकारे अल्प वयातील उद्योजक म्हणून समोर आलेला आणि कुंभमेळ्यातील गर्दीची मोजणी करणारे अॅप विकसित करणारा विलय कुलकर्णी यानेही उपस्थितांना मार्गदर्शन केले. तो म्हणाला, कोणत्याही क्षेत्रात आपल्याला काम करायचे असल्यास त्या क्षेत्राविषयीची माहिती आई-वडिलांना पटवून दिले तर ते पाल्याच्या मागे ठामपणे उभे राहतात. केवळ आपण जे करतो त्याविषयी त्यांना विश्वासार्हता निर्माण होईल एवढ्या आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांनी त्यांच्या संकल्पना मांडायला हव्या. चर्चासत्रानंतर गिरीश पगारे यांनी अश्विन कंडोई व डॉ. महेश सिंघवी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या माध्यमातून नवीन पिढीत उद्योजकतेचा विकासासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळवून देणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)