‘अनाथांचे पालक’ जिल्हाधिकारी होणार सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 01:50 AM2022-03-07T01:50:17+5:302022-03-07T01:53:18+5:30
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क आणि जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह महसुलातील अधिकाऱ्यांनी घेतलेल्या अनाथांच्या पालकत्वाची दखल राज्य शासनाने घेतली आहे. ही संकल्पना राबविणारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा यानिमित्ताने जागतिक महिलादिनी सन्मान केला जाणार आहे.
नाशिक : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क आणि जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह महसुलातील अधिकाऱ्यांनी घेतलेल्या अनाथांच्या पालकत्वाची दखल राज्य शासनाने घेतली आहे. ही संकल्पना राबविणारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा यानिमित्ताने जागतिक महिलादिनी सन्मान केला जाणार आहे.
एकात्मिक बाल विकास विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना मुंबईत सन्मान सोहळ्यासाठी पाचारण केले आहे. काेरोनाच्या महामारीत अनेकांना आपले आप्तेष्ट गमवावे लागले. कुणीची पत्नी गेली, तर कुणाचे पती; घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने संपूर्ण कुटुंबीय अधांतरी झाले. या महासंकटात आई आणि वडील गेल्याने तर अनेक मुले अनाथ झाली. त्यांचा सांभाळ कोण करणार, असा प्रसंग उभा राहिल्याने जिल्हा प्रशासन या मुलांसाठी पुढे सरसावले आणि त्यांना आधार दिला.
नाशिकमधील ४० कुटुंबांतील ५८ बालकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांचे पालकत्व स्वीकारले. शासकीय मदतदूत म्हणून या अधिकाऱ्यांनी एकेका बालकाची जबाबदारी घेतली आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांनी स्वत: जुळी बालके दत्तक घेतली आहेत. या बालकांना सरकारी मदत मिळवून देणे, पालकांच्या मिळकतींवर त्यांची नावे लावणे, त्यांच्या पालकांकडून कर्जवसुली, तसेच या बालकांचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी अधिकारी कामकाज पाहत आहेत. राज्यातील हा अभिनव उपक्रम असून, त्याची दखल आता राज्य शासनाने घेतली आहे. जिल्हधिकारी सूरज मांढरे यांचा या निमित्ताने महिलादिनी मुंबईत गौरव केला जाणार आहे.
--इन्फो--
इतक्या अधिकाऱ्यांनी अत्यंत गरजू लोकांपर्यंत सेवा देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन अशी मोहीम हाती घेणे ही दुर्मीळ बाब आहे. आम्हा सर्वांना शासकीय सेवेत असल्याचा अभिमान वाटणारा हा क्षण आहे.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी