सिल्व्हर ओक शाळेसमोर पालकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:22+5:302021-03-09T04:17:22+5:30
नाशिक : कोरोनामुळे मागील वर्षात प्रत्यक्ष शाळांमध्ये शिक्षण झाले नाही. ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी शाळेतील पायाभूत सोयी-सुविधांचा लाभ घेतला ...
नाशिक : कोरोनामुळे मागील वर्षात प्रत्यक्ष शाळांमध्ये शिक्षण झाले नाही. ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी शाळेतील पायाभूत सोयी-सुविधांचा लाभ घेतला नाही. त्याचप्रमाणे शाळेतील उपकरणे, प्रयोग शाळांचाही वापर केला नाही. त्यामुळे शैक्षणिक शुल्काव्यतिरिक्त अन्य कोणतेही शुल्क न देण्याची भूमिका घेत सोमवारी (दि. ८) शाळेच्या गेटसमोर निदर्शने केली.
सिल्व्हर ओक शाळा प्रशासनाने पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी पालकांना टप्प्याटप्प्याने प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बोलावून त्यांच्याकडून मागील वर्षातील शुल्काची मागणी केली जात असल्याची माहिती पालकांनी दिली. शुल्क भरले नाही तर विद्यार्थ्यांचे निकाल मिळणार नाहीत, त्याचप्रमाणे पुढील वर्गात प्रवेश मिळणार नसल्याची भूमिका शाळा प्रशासनाने घेतल्याचे पालकांकडून सांगण्यात आले. पालक मागील वर्षातील शैक्षणिक शुल्क देण्यास तयार आहेत; परंतु शाळेकडून देखभाल दुरुस्तीचे लादले जाणारे अतिरिक्त खर्च शाळा प्रशासनाने या वर्षाच्या शुल्कातून वगळावे, अशी पालकांची मागणी आहे. मात्र, शाळा प्रशासनाकडून पालकांच्या मागणीला प्रतिसाद मिळत नसल्याने पालकांनी शाळेला गुुरुवारपर्यंत मुदत दिली आहे. शाळेने पालकांच्या मागणीवर सकारात्मक विचार केला नाही तर शुक्रवारी पुन्हा शाळेसमोर आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. दरम्यान, शाळेकडून याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
===Photopath===
080321\08nsk_29_08032021_13.jpg
===Caption===
सिल्वर ओक शाळेच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करताना पालक