शाळा भरवण्यासाठी मुख्याध्यापकांसह पालक नाखूश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:19 PM2020-06-11T22:19:48+5:302020-06-12T00:27:07+5:30
सिन्नर : नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होत असून, बहुतांश शाळांमध्ये आॅनलाइन अध्यापन सुरू करण्यात आले आहे. तथापि मुख्याध्यापकांना दि. १५ जूनपासून शाळा भरवावयाच्या असल्यास हमीपत्र दोन दिवसात सादर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून एका पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत. मात्र, हमीपत्र देण्यास मुख्याध्यापक नाखूश असून, शाळेत घाईत मुले पाठविण्यास पालक राजी नसल्याचे चित्र आहे.

दि. १५ जूनपासून शाळा भरवण्यास तयारी आहे का याची विचारणा करण्यात आली आहे. त्यासाठी हमीपत्र द्यावे, असे पत्र दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिकच्या ३४९ मुख्याध्यापकांना आॅनलाइन देण्यात आले. या पत्राने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोरोना संसर्ग काळात शाळा व विद्यार्थ्यांची जबाबदारी मुख्याध्यापकांवर देण्यात आल्याने कोणत्याही प्रकारचे हमीपत्र भरून देण्यास मुख्याध्यापकांकडून विरोध असल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव एस.बी. देशमुख यांनी दिली. बुधवारपर्यंत (दि. १०) शिक्षण विभागाकडे एकाही मुख्याध्यापकाने हमीपत्र भरून दिले नव्हते. १५ जूनपासून शिक्षकांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. शाळा सुरू करण्यासाठी ग्राम समिती, व्यवस्थापन समिती व शिक्षक-पालक समितीचे ना हरकत दाखले आवश्यक करण्यात आले आहे.
शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, मास्क वापरले जातील, वारंवार हात धुण्याची सुविधा असेल, ताप मोजमाप यंत्रणा उपलब्ध करणे शाळांमध्ये बंधनकारक केले आहे. वारंवार आरोग्य तपासणी करणे, पालकांची गर्दी होऊन देणे अशा अटीपत्रानुसार घालण्यात आल्या आहेत. मात्र, या अकरा अटींना शालेय समित्या, मुख्याध्याकांकडून विरोध करण्यात येत आहे.
--------------------
शाळा सुरू करायची झाल्यास शासनाने सर्व शाळांना वैद्यकीय भौतिक सुविधा पुरवाव्यात. १५ जूनपासून शाळा सुरू करण्यास मुख्याध्यापक नाराज आहेत. आधी मोठ्या वर्गातील शाळा सुरू करून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू कराव्यात.
- एस. बी. देशमुख, सचिव, जिल्हा मुख्याध्यापक संघ