सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या विरोधात ठिय्या आंदोलन करणारे पालक.
By admin | Published: October 30, 2015 12:01 AM2015-10-30T00:01:22+5:302015-10-30T00:01:39+5:30
शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना फळ्यावर प्रश्नपत्रिका
इंदिरानगर : राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही त्यांना प्रश्नपत्रिका न देता फळ्यावर प्रश्न लिहून दिले. तसेच विद्यार्थ्यांचे ओळखपत्रही जमा केल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या प्रांगणातच संस्थेच्या विरुद्ध ठिय्या आंदोलन केले. शाळेच्या फी वाढीवरून पालकांनी अनेक वेळेस आंदोलन केले आहे.
राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. यामध्ये बहुतेक विद्यार्थी परिसरातील असून, शासकीय- निमशासकीय कामगार पालक आहेत. सुमारे दोन वर्षांपासून फी वाढीवरून पालकवर्गाचे आंदोलन आणि लढा चालू आहे. आज शाळेत सहामाई परीक्षा सुरू असून, ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही. त्या सर्व विद्यार्थ्यांना स्वतंत्र वर्गात बसवून त्यांना फळावर प्रश्न लिहून विद्यार्थ्यांनी ते लवकर लिहून घेऊन त्यांची उत्तरे उत्तरपत्रिका लिहावी, असे सांगण्यात आले. तसेच त्या विद्यार्थ्यांचे शाळेचे असलेले ओळखपत्रकही शाळेने जमा करून घेतले. त्यामुळे विद्यार्थी कुठे हरविले किंवा त्याचे अपहरण झाले तर जबाबदार कोण. तसेच शिक्षण विभाग पालक-शिक्षक संघाची मान्यता घेऊन आणि राज्य शासनाचा नवीन जी.आर २०१४ नुसार फीची मान्यता मिळाली पाहिजे. कोणतीही मान्यता न घेता फीची भरमसाठ वाढ होत आहे. तसेच शाळा आणि संस्था स्वत:ची मनमानी करून विद्यार्थी आणि पालक वर्गास मानसिक व आर्थिक त्रास देत आहे. त्यामुळे संतप्त अजय भवरे, मृदुला दुबे, अशोक उसवालकर, नंदकिशोर अहिरे, अॅड. अंकिता सिन्हा, सचिन गांगुर्डे, राजेश सोनी, वैशाली पाटील, मानसी कुलकर्णीसह सुमारे ६० पालकांनी शाळेच्या प्रांगणातच ठिय्या आंदोलन केले. (वार्ताहर)