उद्यान उपआयुक्तांवर आर्थिक मागणीचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:22 AM2020-02-11T00:22:12+5:302020-02-11T01:09:08+5:30
नऊ वर्षांच्या खंडानंतर गेल्यावर्षी महापालिकेने भरवलेल्या पुष्पप्रदर्शनाचा दरवळ याही वर्षीही फुलणार असतानाच यासंदर्भातील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या संचालकाने उद्यान उपायुक्तांनी सहा लाख रुपयांचे देयक अडवल्याची आणि त्यासाठी दीड लाख रुपयांची आर्थिक मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, उपआयुक्तशिवाजी आमले यांनी त्याचा इन्कार केला असून, मुळातच त्यांचे कोणतेही देयक प्रलंबित नाही आणि त्यानंतर त्यांच्याकडून कोणतीही मागणी केली नसल्याचे स्पष्टीकरण देतानाच कारवाईचा इशाराही दिला आहे.
नाशिक : नऊ वर्षांच्या खंडानंतर गेल्यावर्षी महापालिकेने भरवलेल्या पुष्पप्रदर्शनाचा दरवळ याही वर्षीही फुलणार असतानाच यासंदर्भातील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या संचालकाने उद्यान उपायुक्तांनी सहा लाख रुपयांचे देयक अडवल्याची आणि त्यासाठी दीड लाख रुपयांची आर्थिक मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, उपआयुक्तशिवाजी आमले यांनी त्याचा इन्कार केला असून, मुळातच त्यांचे कोणतेही देयक प्रलंबित नाही आणि त्यानंतर त्यांच्याकडून कोणतीही मागणी केली नसल्याचे स्पष्टीकरण देतानाच कारवाईचा इशाराही दिला आहे.
महापालिकेत गेल्यावर्षी पुष्पप्रदर्शन झाले होते. त्यात आशिष दिवेकर मल्टी सर्व्हिसेस यांना कामे देण्यात आले होते. हे पुष्पप्रदर्शन पार पडताना मूळ खर्च २४ लाख ७७ हजार रुपये त्यांना देण्यात आला असला तरी त्यावेळी झालेले सुमारे सहा लाख रुपयांचा खर्च अद्याप मिळालेला नाही. त्याबदल्यात आमले यांनी अन्य निरीक्षकामार्फत दीड लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप दिवेकर यांनी सोमवारी (दि.१०) पत्रकार परिषदेत केला. सहा लाख रुपयांसाठी ११ महिन्यांपासून आपल्याला त्रास दिला जात असून, त्यामुळे आपले अनेक प्रकारचे कर भरणे थकल्याचे दिवेकर यांचे म्हणणे आहे. आपण यासंदर्भात महापालिका आयुक्त त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक खाते यांच्याकडेही तक्रार केल्याचे तसेच निरीक्षकाचे कॉल रेकॉर्ड केल्याचेही त्यांनी सांगितले.
पुष्पोत्सवाच्या वेळी फ्लॉवर टॉवर, सोफ्याचा वापर करून सेल्फी पॉइंट असे अनेक सुविधा आपण दिल्या. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पुणे येथील कलावंतांना हजारो रुपये दिले. परंतु नंतर मनपाने कार्यक्रम रद्द केला त्याचे पैसे कलावतांकडून मिळणे शक्य नाही आणि महापालिकेकडूनही मिळत नाही. या सर्व अडचणींमुळे आता प्रलंबित सहा लाख रुपयांचे देयक न मिळाल्यास २० फेब्रुवारीस पुष्पोत्सवाच्या वेळीच मनपासमोर सहकुटुंब आंदोलन करण्याचा इशारा दिवेकर यांनी दिला आहे.
उपआयुक्त आमले यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. तसेच दिवेकर यांच्यावर बदनामी प्रकरणी खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. दिवेकर यांना मंजूर निविदेपेक्षा अतिरिक्त सहा लाख रुपये देण्याचा कोणताही प्रश्न नाही. पुष्पप्रदर्शनातील कार्यक्रमासाठी कलावंतांना त्यांनी दिलेले पैसे मनपाकडून मागणे, सुरक्षारक्षक न नेमता नुकसानीबाबत महापालिकेला दोष देणे हे अत्यंत चुकीचे आहे. अलीकडेच त्यांनी मुदत संपल्यानंतर निविदा भरण्याची तयारी दर्शविली. त्यास नकार दिल्याने त्यांनी हेआरोप केले असावे, असे आमले यांनी सांगितले.