कुंभमेळ्यात पार्किंगच्या जागा वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 08:53 PM2024-06-07T20:53:08+5:302024-06-07T20:53:22+5:30
अधिकाऱ्यांनी विविध पार्किंगच्या ठिकाणांची, तसेच रस्त्यांची पाहणी केली.
नाशिक (सुयोग जोशी) : लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबतचे नियाेजन सुरू करण्यात आले असून शुक्रवारी (दि. ७) आयुक्त तथा प्रशासनाधिकारी डॉ. अशोक करंजकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी विविध पार्किंगच्या ठिकाणांची, तसेच रस्त्यांची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (शहर) प्रदीप चौधरी, नगररचनाचे उपसंचालक हर्षल बाविस्कर, शहर अभियंता संजय अग्रवाल, इंजिनिअर संदेश शिंदे, इंजिनिअर जितेंद्र पाटोळे आदी सहभागी झाले होते.
डोंगरे वसतीगृह, मिरची पॉईंटची जागा, पांझरापोळ, पेठराेडवरील जागा, पेठरोडवरील स्टेडियम, कुुसुमाग्रज उद्यान ते बाळासाहेब ठाकरे स्मृति संग्रहालय, रामवाडी पुलाला समांवर पशूवैद्यकीय हॉस्पिटलजवळील जागांची पाहणी करण्यात आली. त्यात कोणत्या जागांवर पार्किंग होवू शकते याबाबत तपासणी करण्यात आली. सिंहस्थासाठी बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची मोठी जागा लागणार आहे. भारतातून येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता जागा अधिक लागू शकते, त्यामुळे जेथे जेथे मोकळी जागा अधिक मिळू शकते, त्याच ठिकाणांची पाहणी करण्यात आली. मात्र येत्या काळात इतरही पार्किंगच्या ठिकाणांची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व माहिती एकत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. तेथे तयार करण्यात आलेल्या शिखर समितीच्या सदस्यांकडे सदर कामांचा सविस्तर अहवाल सोपविला जाणार आहे.
शक्यतांची पडताळणी
कुसुमाग्रज उद्यानापासून संपादित रस्त्याने मखमलाबाद रोड व त्या रोडवरील मिसिंग लिंकचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पेठरोडच्या सर्वच रस्त्यांबरोबरच सीता सरोवर म्हसरूळ येथील पौराणिक ठिकाणांची पाहणी करण्यात आली. शिवाय म्हसरूळ-वरवंडी रोडवरील कामांची आयुक्तांनी माहिती घेतली. याही रस्त्यावर भविष्यात काय काय कामे करता येतील त्याच्याही शक्यता पडताळण्यात आल्या.