खासदार संसदेत जाणारा हवा की जेलमध्ये? : आदित्य ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 01:41 AM2019-04-16T01:41:49+5:302019-04-16T01:42:48+5:30
नाशिक : जनतेला खासदार संसदेत जाणारा हवा की जेलमध्ये, असे म्हणत जेलमध्ये लोकांसाठी नव्हे तर मनीलॉँड्रिंगसारख्या देशद्रोहसदृश कामासाठी जाणाऱ्यांना ...
नाशिक : जनतेला खासदार संसदेत जाणारा हवा की जेलमध्ये, असे म्हणत जेलमध्ये लोकांसाठी नव्हे तर मनीलॉँड्रिंगसारख्या देशद्रोहसदृश कामासाठी जाणाऱ्यांना संधी द्याल काय, असा थेट प्रश्न शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना-भाजप युतीची प्रचारसभा सिडकोतील पवननगर येथील नानासाहेब उत्तमराव पाटील मैदानावर सोमवारी (दि.२५) सायंकाळी झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
देशात आणि राज्यात कॉँग्रेस राष्टÑवादीची सत्ता असताना त्यांनी अनेक घोटाळे केले. सिंचन घोटाळे केल्यानेच दुष्काळ फोफावला. राज्यात तर कॉँग्रेस भ्रष्टवादी नेत्यांची कामे निस्तारण्यातच सरकारची पाच वर्षे गेली असे सांगून आदित्य ठाकरे यांनी त्यांनी घोटाळे केले म्हणून ते जेलमध्ये जाऊन आले आणि आताही तेच मत मागत आहेत. तेव्हा अशांना मतदान देणार का, असा प्रश्न केला. गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होती, परंतु विधानसभेत ती राहिली नाही. त्यावर आता अनेकजण साडेचार वर्षे भांडले, आता सत्तेसाठी एकत्र आल्याची टीका करीत आहेत. मात्र, जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा सत्तेचा विषय बाजूला पडतो. आता युती कधीच तुटणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी गुलाबराव पाटील यांनीदेखील साडेचार वर्षे भांडूनही भाजप-सेनेने सतराशेसाठ पक्षांच्या आघाड्या केल्या नाहीत. हिंदुत्वाच्या भरवशावरील युती कायम असल्याचे सांगून त्यांनीही महाआघाडीवर टीका केली. आमदार सीमा हिरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कोकाटेंवर टीका
आपल्यासारख्या पानटपरीवाल्यांना शिवसेनेने मोठे केले आहे. त्यामुळे आमची आजची पिढी शिवसेनेबरोबरच आहे आणि नातूदेखील शिवसेनेबरोबरच राहतील, असे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगून शिवसेनेच्या नावावर आमदार झालेल्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये, अशी टीका कोकाटे यांचा नामोल्लेख न करता केली.
नेते तेथेच, उमेदवार गायब
शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा सुरू असताना भाषण करून उमेदवारच गायब झाले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना उमेदवाराचा उल्लेख करून विधान करताना अडचण निर्माण झाली. त्यांनी उमेदवार पुढे गेले आहेत, असे सांगून सावरून घेतले. व्यासपीठावर सर्वच सिडकोतील सर्व नगरसेवक तसेच शहरातील पदाधिकारी यांची इतकी गर्दी झाली होती की नियोजन विस्कळीत झाले. अनेक नेत्यांना व्यासपीठावर सभा होईपर्यंत उभे राहावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.