पेठ एमआयडीसीतील जलकुंभ धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 05:00 PM2018-11-29T17:00:07+5:302018-11-29T17:00:23+5:30
दुर्लक्ष : कोणत्याही क्षणी कोसळण्याची भिती
पेठ -शहराच्या पश्चिमेकडील राष्ट्रीय महामार्गालगत औद्योगिक वसाहतीत असलेला जुना जलकुंभ अखेरच्या घटका मोजत असून अतिशय धोकेदायक स्थितीत असलेला हा जलकुंभ कोणत्याही क्षणी कोसळण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
सन १९९० मध्ये उद्योग वाढीच्या दृष्टीने पेठ शहरालगत असलेल्या जागेत औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आली. प्रारंभी काही लहान मोठया उद्योजकांनी आपले व्यवसायही सुरू केले. मात्र आवश्यक तेवढा प्रतिसाद न मिळाल्याने शिवाय वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध न झाल्याने टप्पाटप्याने उद्योजकांनी पेठ मधून काढता पाय घेतला. जे काही बांधकाम करण्यात आले होते, त्यांची अक्षरश: वाताहत झाली असून औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ अतिशय जीर्ण झाला असल्याने त्यालाही तडे पडले आहेत. त्यामुळे जलकुंभ कोणत्याही क्षणी कोसळण्याची भिती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने मात्र सदरचा जलकूंभ धोकेदायक असल्याचा फलक लावण्याची तयारी दाखवली असली तरीही सदरचा जलकुंभ जमीनदोस्त करण्याची तसदी मात्र घेतली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.