आणखी एका संशयिताचा सहभाग
By admin | Published: January 17, 2017 02:06 AM2017-01-17T02:06:31+5:302017-01-17T02:06:44+5:30
बनावट नोटा प्रकरण : लवकरच अटकेची शक्यता
नाशिक : एक कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणात शहरातील आणखी एका संशयिताचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, त्यास लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ या प्रकरणात आडगाव पोलिसांनी आतापर्यंत १२ संशयिताना अटक करण्यात आली असून, हे सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत़
पुणे आयकर विभागाच्या माहितीवरून आडगाव पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरे, संदीप सस्ते, रामराव पाटील-चौधरी, रमेश पांगारकर यांच्यासह ११ संशयिताना बनावट नोटा छापून त्यांची कमिशनवर अदलाबदल करताना जत्रा हॉटेल परिसरात अटक केली होती़ त्यांच्याकडून एक कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा तसेच एक लाख ८० हजार रुपयांच्या जुन्या चलनातील पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटाही जप्त केल्या होत्या़ पोलिसांनी छबू नागरेच्या खुटवडनगरमधील आॅसम ब्यूटिपार्लरमधून नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर, कॉम्प्युटर, शाई, कागद आदि साहित्यही जप्त केले़ तसेच संशयितांच्या बँक खात्यातील तपासणी करून ते सीलही केले़ नागरेकडे नोटा छपाईचे प्रमुख काम करणारा कृष्णा रामस्वरूप अग्रवाल या बाराव्या संशयितास अटक करण्यात आलेली आहे़ या संशयितांकडून जमा केलेल्या पुराव्यांनुसार तपास सुरू असल्याची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिली़ दरम्यान, या गुन्ह्णात पोलिसांनी आतापर्यंत १२ संशयितांना अटक केली असली तरी यामध्ये आणखी एकाचा सहभाग समोर आला आहे़ हा संशयित शहरातीलच असून, त्यास लवकरच अटक करण्यात येणार असल्याचेही सानप यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)