पानी फाउंडेशनच्या कामात चिमुकल्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 05:31 PM2019-05-12T17:31:09+5:302019-05-12T17:32:10+5:30
सिन्नर : तालुक्यातील डुबेरे येथे सुरू झालेल्या पानी फाउंडेशनच्या कामात चिमुकल्या हातांनी सहभाग नोंदविला. शाळेला सुट्टी असल्याने व गावातील भीषण दुष्काळाची परिस्थितीची जाण लहान बालकांच्या मनामध्ये निर्माण झाल्याने त्यांनी कामात सहभाग नोंदविला.
फक्त पुस्तकातच पाण्याचे महत्व वाचून जमणार नाही, तर आपल्यालाही पाण्याच्या कामामध्ये सहभागी व्हावे लागेल, ही भावना त्यांच्या मनामध्ये रूजवल्याने आईबरोबर त्यांनीही पानी फाउंडेशनच्या कामात हातभार लावला. एलबीटी प्रकारातील दोन छोटे बंधारे तयार करण्यासाठी चिमुकल्यांचा हातभार लागला. कल्पना मौर्य, कोमल भागवत, पल्लवी वाजे, कृतिका खडांगळे, अक्षदा वाजे, सुमीत क डाळे या विद्यार्थीनींनी श्रमदान केले. कामाची सुरूवात झाल्याने लोकांना चिमुकल्यांनी श्रमदानासाठी येण्याचे आवाहन यावेळी केले. ‘जल है तो कल है’ असे उद्गार चिमुल्यांच्या तोंडातून ऐकताना पाण्यासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उन्हाळ्याची सुट्टी असतानाही मामाचे घर गाठण्यापेक्षा जलसंधारणाच्या कामात सहभाग नोंदविल्याने त्यांचे कौतुक होत आहे.