आरक्षण सोडतीकडे पक्षांचे लक्ष
By admin | Published: August 21, 2016 10:03 PM2016-08-21T22:03:06+5:302016-08-21T22:19:46+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : इगतपुरी तालुक्यात मोर्चेबांधणी करण्यास प्रारंभ
घोटी : राज्यातील सर्व पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाल यावर्षी संपुष्टात येत असल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणाऱ्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने इगतपुरी तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
यामुळे आगामी निवडणुकीत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा जिंकण्यासाठी तसेच इगतपुरी पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यात प्रत्येक प्रबल पक्षाकडून गट व गणनिहाय आढावा बैठका घेऊन आगामी रणनीती ठरविण्याकडे सर्वच राजकीय पक्षांचा कल वाढला आहे.
इगतपुरी तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मागील निवडणुकीत आघाडी आणि युतीचे स्वप्न भंग पावले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा आणि मनसे या राजकीय पक्षांनी स्वबळावर ही
निवडणूक लढविली होती. यात जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी व शेकाप वगळता इतर पक्षांना खातेही उघडता आले नव्हते, तर पंचायत
समितीत काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला प्रत्येकी तीन जागा, मनसेला दोन, तर शिवसेना व अपक्षाला एक जागा मिळाली होती.
संभाव्य निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची भिस्त केवळ आरक्षण सोडतीकडे असून, कोणत्या गटात कोणते आरक्षण जाहीर होते आणि कोणत्या गणात काय आरक्षण होणार, याबाबत तालुक्यात राजकीय समीकरणे तयार करण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे.
तालुक्यातील पाच गटांपैकी धारगाव, नांदगाव सदो व खेड हे गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित होण्याची दाट शक्यता आहे, तर घोटी व वाडीवऱ्हे हे गट इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.
गणांपैकी घोटी हा गण लोकसंख्येच्या आधारावर अनुसूचित जातीसाठी आरक्षित होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, या निवडणुकांपूर्वी तालुक्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याचे चित्र निर्माण झाले असून, अनेक इच्छुक पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. (वार्ताहर)