रिक्षाचालकांसह प्रवाशांची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 01:55 AM2019-12-03T01:55:57+5:302019-12-03T01:56:20+5:30
: शहरातील रिक्षा वाहतुकीला शिस्त लागावी, या हेतूने शहर वाहतूक नियंत्रण शाखा, आरटीओकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. रिक्षाचालकांनी रिक्षाचे मीटर कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नाशिक : शहरातील रिक्षा वाहतुकीला शिस्त लागावी, या हेतूने शहर वाहतूक नियंत्रण शाखा, आरटीओकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. रिक्षाचालकांनी रिक्षाचे मीटर कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच २७ रिक्षा थांब्यांवरून ५४ मार्गांवर शेअर-ए-रिक्षा सेवा जाहीर करण्यात आली आहे. मात्र या सेवेमुळे रिक्षाचालकांसह प्रवाशांचीही कोंडी होत आहे. कारण आरटीओने या सेवेअंतर्गत जाहीर केलेले दर हे वाजवी नसल्याचे प्रवासी सांगत त्यानुसार पैसे देण्यास नकार देत असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. एकूणच शहराची रिक्षा वाहतुकीच्या दराबाबत कमालीची अनिश्चितता निर्माण झाल्याचे चित्र आहे. मीटरप्रमाणे रिक्षा चालविणे रिक्षाचालकांवर बंधनकारकच आहे, मात्र शेअर-ए-रिक्षा सेवेच्या ५४ मार्गांवर मीटरची सक्ती करण्यात आली नसून किलोमीटरनुसार आरटीओने ठरवून दिलेले दर आकारण्याची मुभा दिली गेली आहे. हे दर रिक्षाचालकांच्या सोयीचे असून, प्रवाशांना डोईजड वाटत असल्याने प्रवासी त्यास नकार देत आहेत. त्यामुळे रिक्षाचालक कोंडीत सापडला आहे. यामुळे रिक्षाचालक प्रवाशांना विश्वासात घेऊन ‘खरे’ दर सांगत बसवून घेण्यास प्राधान्य देत आहे.
...तर रिक्षाचालक करतात कारवाईचे स्वागत!
एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे घेण्याची मागणी केली आणि रिक्षाचालकाने ती नाकारली तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि रिक्षाचालकाकडून परमिट, मूळ वाहन चालविण्याचा परवाना, बॅच, विमा, पीयूसी, गणवेश यांसारख्या बाबींची पूर्तता होत नसेल तर अशा संबंधित रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सीबीएस परिसरातील थांब्यावरील काही रिक्षाचालकांनी सांगितले.