प्रवाशाचा बसमध्येच हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 10:48 PM2017-08-12T22:48:25+5:302017-08-13T01:18:27+5:30
नाशिक-नंदुरबार बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाचा हृदयविकाराने बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर शुक्र वारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
सटाणा : नाशिक-नंदुरबार बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाचा हृदयविकाराने बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर शुक्र वारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेबाबत सटाणा आगाराच्या व्यवस्थापकांकडून मिळालेली माहिती अशी की, नाशिकहून नंदुरबारकडे निघालेली पिंपळगाव बसवंत आगाराची बस (एम एच १४ बीटी ४८५३) शुक्रवारी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी वीरगावजवळील हॉटेल शाहूजवळ आली असता बसमधील प्रवासी चिमण पाटील (७०, राहणार बल्हाणे, ता. साक्री) यांना अचानक छातीत दुखू लागल्याचे बसमधील सहप्रवाशांच्या लक्षात आले. प्रवाशांनी याबाबतची माहिती बसवाहक आणि चालकाला दिली. बसचालक एस. बी. मुकळे यांनी समयसूचकता राखत बस प्रवाशांसह थेट ताहाराबाद येथील एका रुग्णालयात नेली. डॉक्टरांनी पाटील यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या खिशातील मोबाइल व आधारकार्डवरून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात येऊन घटनेची माहिती देण्यात आली. ते नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वीरगाव शाखेचे व्यवस्थापक संजय पाटील यांचे वडील होत.