प्रवासी वाहनचालक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:19 AM2021-02-17T04:19:51+5:302021-02-17T04:19:51+5:30
शेअरिंग कारला मिळतेय पसंती नाशिक : डिझेल दरवाढीचा पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून खासगी प्रवासी वाहने घेऊन प्रवास ...
शेअरिंग कारला मिळतेय पसंती
नाशिक : डिझेल दरवाढीचा पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून खासगी प्रवासी वाहने घेऊन प्रवास करणारांची संख्या घटली आहे. यामुळे शहरातील अनेक टुरिस्ट टॅक्सी चालकांना ग्राहक मिळणे मुश्कील झाले आहे. अनेक प्रवासी स्वतंत्र गाडी करण्यापेक्षा शेअरिंग कारला अधिक पसंती देत असल्याचे दिसते.
नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
नाशिक : कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढू लागल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन महापालिका आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा वेळोवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे.
निमाणी परिसरात वाहतुकीला अडथळा
नाशिक : पंचवटीतील निमाणी बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या नित्याची बाब बनली आहे. बस स्थानकातून बाहेर येणाऱ्या आणि आतमध्ये जाणाऱ्या बसेसमुळे या ठिकाणी दिवसातून अनेकवेळा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पेठ रोड परिसरात अस्वच्छता
नाशिक : पंचवटीतील पेठ रोड परिसरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे काही ठिकाणहून जाताना नागरिकांना नाक मुठीत धरुन मार्गक्रमण करावे लागते. महापालिकेने या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरवस्था
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीमधील अनेक रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या परिसरात दिवस रात्र कामगारांची वर्दळ सुरू असते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रात्रीच्यावेळी कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी त्रस्त वाहन चालकांनी केली आहे.
रेंज मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त
नाशिक :काही मोबाईल कंपन्यांच्या ग्राहकांना रेंज न मिळण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे हे ग्राहक त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिक यामुळे दुसऱ्या कंपनीची सेवा घेतात. याबाबत संबंधीत कंपनीने योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी त्रस्त ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
पथदिवे मोकळे करावे
नाशिक : शहरातील काही भागातील पथदिवे झाडांच्या आड झाकले गेल्याने या पथदिव्यांचा जमिनीवर पुरेसा प्रकाश पडत नाही. यामुळे रात्रीच्या वेळी या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. झाडांच्या फांद्या छाटून पथदिवे मोकळे करावेत अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.