पॅसेंजर रेल्वेगाड्या होणार ‘एक्स्प्रेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 11:55 PM2020-06-18T23:55:35+5:302020-06-19T00:27:33+5:30
रेल्वे प्रशासनाने दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्या आता एक्स्प्रेस करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे रेल्वे प्रवासी भाड्यात वाढ होणार असली तरी प्रवाशांचा वेळदेखील वाचणार आहे. यामध्ये नाशिकशी संबंधित भुसावळ-मुंबई, देवळाली-भुसावळ या दोन गाड्यांचा समावेश आहे.
नाशिकरोड : रेल्वे प्रशासनाने दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्या आता एक्स्प्रेस करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे रेल्वे प्रवासी भाड्यात वाढ होणार असली तरी प्रवाशांचा वेळदेखील वाचणार आहे. यामध्ये नाशिकशी संबंधित भुसावळ-मुंबई, देवळाली-भुसावळ या दोन गाड्यांचा समावेश आहे.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे पॅसेंजरच्या प्रवाशांना जादा भाडे मोजावे लागणार आहे. पॅसेंजरचे भाडे किमान दहा होते ते एक्स्प्रेस गाड्या झाल्यामुळे तीस रुपये होणार आहे. मात्र प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. रेल्वे प्रशासनाने देशातील विविध विभागांतील सुमारे पाचशे पॅसेंजर गाड्यांची यादीच जाहीर केली आहे. या निर्णयामुळे लॉकडाऊनमुळे झालेला तोटा भरून काढण्यास मोठी मदत होणार आहे. १९ जूनला याबाबत अंतिम अहवाल सर्व रेल्वे विभागांनी द्यायचा असून, तातडीने अंमलबजावणीही करायची असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
३३ रेल्वे गाड्यांची यादी
मध्य रेल्वेच्या ३३ पॅसेंजर आता एक्स्प्रेस होणार आहेत. त्यामध्ये भुसावळ-मुंबई, देवळाली-भुसावळ, भुसावळ-इटारसी, भुसावळ-नागपूर, भुसावळ-वर्धा, भुसावळ-कटनी, पुणे-मनमाड, पुणे-कोल्हापूर, पुणे-निजामाबाद, मुंबई-परळी, मीरज-हुबळी, मुंबई-पंढरपूर, पंढरपूर-निजामाबाद आदींचा समावेश आहे.
नाशिकशी संबंधित तीन पैकी दोन पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर होणार आहे. त्यामध्ये भुसावळ-मुंबई व देवळाली-भुसावळ या दोन गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांना नेहमी गर्दी असते. इगतपुरी-मनमाड पॅसेंजरमध्ये मात्र बदल करण्यात आलेला नाही.
रेल्वे सेवा जेव्हा सुरळीत होईल, तेव्हा अंंमलबजावणी सुरू होईल.