गोदावरीच्या उजव्या कालव्यावरून प्रवासी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 01:01 AM2018-03-26T01:01:32+5:302018-03-26T01:01:32+5:30
गोदावरी नदीच्या उजव्या कालव्याच्या मार्गावर आता प्रवासी वाहतूक करण्याची तयारी महापालिकेने केली असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तसे सूतोवाच केले आहे. सध्या या कालव्याच्या जागेचे मोजमाप तसेच अतिक्रमणांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यावर प्रवासी वाहतुकीसाठी वेगवेगळे प्रारूप विचाराधीन आहेत.
नाशिक : गोदावरी नदीच्या उजव्या कालव्याच्या मार्गावर आता प्रवासी वाहतूक करण्याची तयारी महापालिकेने केली असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तसे सूतोवाच केले आहे. सध्या या कालव्याच्या जागेचे मोजमाप तसेच अतिक्रमणांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यावर प्रवासी वाहतुकीसाठी वेगवेगळे प्रारूप विचाराधीन आहेत. नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना राबवल्यानंतर महापालिका हद्दीतील हा कालवा बंद झाला. आता या कालव्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली आहेत. असे असले तरी शहरातील या कालव्याची बहुतांशी जागा ही मोकळी आहे. त्यामुळे अतिक्रमणे हटवून कालव्याच्या जागेचा सुयोग्य वापर केल्यास त्यावरून किमान प्रवासी वाहतूक होऊ शकते. यासंदर्भात, नाशिक सिटीझन फोरमने मध्यंतरी महापालिकेला निवेदनही दिले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून, त्यांनीदेखील तशी तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या वतीने गोदावरी नदीवरील या कालव्याच्या लांबी आणि रुंदीचे मोजमाप सुरू असून, अतिक्रमणे कोठे कोठे आहेत, त्यातील पक्की आणि कच्ची बांधकामे किती याबाबत सर्वेक्षण सुरू आहे. सदरचे काम झाल्यानंतर अतिक्रमणे हटविण्याची धडक मोहीम हाती घेणार असून, त्यानंतर या जागेवर प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. आयुक्त मुंढे यांनी अलीकडेच एका कार्यक्रमातदेखील प्रवासी वाहतुकीची तयारी दर्शविली आहे.
गंगापूर धरण ते एकलहरा दरम्यान असलेल्या या कालव्याची महापालिका हद्दीत किमान वीस किलोमीटर लांबी आहे. याठिकाणी बीएआरटीएस म्हणजेच केवळ बससेवेसाठीच स्वतंत्र मार्गिका तयार करून बससेवेबरोबरच सायकल ट्रॅक तयार करण्याचा महापालिकेचा विचार आहे. तथापि, ट्रामसारखे अन्य पर्यायदेखील पडताळून पाहण्याची सूचना नाशिक सिटिझन फोरमने
केली आहे.
ट्राम सेवेचा विचार व्हावा
युरोपात आणि कोलकात्यात आजही पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना ट्रामविषयी आकर्षण आहे. शिवाय ही सेवा किफायतशीर असल्याने त्यादृष्टीने महापालिकेने विचार केला पाहिजे, अशी सूचना करण्यात आली आहे. आयुक्तांनी या कालव्याच्या पडीक जागेचा सदुपयोग करण्यासाठी उचलेले पाऊल हे नाशिककरांना फायदेशीर ठरणार आहे. - सुनील भायभंग, अध्यक्ष, नाशिक सिटिझन फोरम