रेल्वे अपघातामुळे प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:09 AM2017-08-30T01:09:21+5:302017-08-30T01:09:27+5:30
आसनगाव ते वाशिंददरम्यान मंगळवारी (दि.२९) सकाळी रुळावरील मातीच्या ढिगारावरून दुरंतो एक्स्प्रेसच्या इंजिनासह पहिले सात डब्बे घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून, अनेक रेल्वे गाड्या इगतपुरीपासून रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांना खासगी वाहने व एसटी बसने प्रवास करण्याची वेळ आल्याने प्रवाशांचे जोरदार पावसात प्रचंड हाल झाले.
इगतपुरी : आसनगाव ते वाशिंददरम्यान मंगळवारी (दि.२९) सकाळी रुळावरील मातीच्या ढिगारावरून दुरंतो एक्स्प्रेसच्या इंजिनासह पहिले सात डब्बे घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून, अनेक रेल्वे गाड्या इगतपुरीपासून रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांना खासगी वाहने व एसटी बसने प्रवास करण्याची वेळ आल्याने प्रवाशांचे जोरदार पावसात प्रचंड हाल झाले. सकाळी ७ वाजेच्या दरम्यान इगतपुरी रेल्वेस्थानकवर पंजाब मेल, राज्यराणी एक्स्प्रेस, भुसावळ - पुणे एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस येऊन त्या गाड्या रद्द करून इगतपुरी रेल्वे-स्थानकावरूनच परतीच्या मार्गाला रवाना झाल्या. भुसावळ - पुणे एक्स्प्रेस ही गाडी कसारा येथून रद्द करून परतीच्या मार्गाने रवाना केली. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिककडे जाणाºया प्रवाशांसह लहान मुलांचे मोठे हाल झाले. इगतपुरी रेल्वेस्थानक बाहेर येऊन भरपावसात एसटी महामंडळ व खासगी वाहनाने प्रवास करावा लागला तर काही प्रवाशांनी नाशिककडे धाव घेतली. यावेळी इगतपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्यासह रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक सतीश विधाते, लोहमार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस उपनिरीक्षक भूपेंद्र सिंग, के.के. तिवारी, हेमंत घरटे, कर्मचारी शशिकांत पवार, एम.एस. जाधव, विनोद साळवे, गजानन जाधव, डी.एम. पालवे, तुकाराम अंधाळे, के.पी. बके, गायत्री वर्मा, अनिता तायडे, विनोद गोसावी, ईश्वर गंगावणे, गणेश वराडे, सचिन देसले आदींनी मदत केले.