बसथांबा हलवूनही प्रवाशांचे हाल
By admin | Published: January 29, 2017 11:41 PM2017-01-29T23:41:54+5:302017-01-29T23:42:09+5:30
मालेगाव : मोसमपुलावरील वाहतुकीची समस्या कायमच..!
मालेगाव कॅम्प : मालेगावी मुख्य रस्त्यांवरील बसथांब्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा ठरत असल्याने मोसमपुलावरील बसथांबा एस. टी. महामंडळाने तूर्त तेथून हलवून काही अंतरावर नेला आहे. परंतु नवीन थांब्यामुळे अधिक अडचणींना शहरवासीयांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा प्रश्न पोलीस प्रशासनाच्या पाचवीला पुजला आहे. बसस्थानकापर्यंत विविध गावाहून पोहचणाऱ्या बसेस शहरातील अनेक थांब्यांवर या अगोदर प्रवासी उतरतात. यात मोसमपुलावर, म. फुले पुतळा परिसरात पुणे, मुंबई, नाशिक, मनमाड येथील प्रवासी उतरतात. तसेच बसस्थानकातून निघालेल्या बसमध्ये पुढच्या प्रवासासाठी चढण्यासाठी येथे गर्दी असते. या चौकात कुठलीही सुविधा नसलेल्या एक प्रकारच्या अनधिकृत अनेक वर्षांपासून असलेला हा थांबा या परिसरात वाहतुकीची कोंडी करणारा ठरला होता. दिवसभरात शेकडो बसेस येथून ये-जा करतात. प्रवासी येथून प्रवास करण्यासाठी धडपड करीत असताना दिसतात. नवीन खानावळीसमोर असलेला थांबा अगोदरच अतिक्रमणाच्या गर्दीत आहे. तेथे लहानमोठे मालवाहू मोटारी, रिक्षा यांची मोठी गर्दी असते. यात बस आल्यावर नवीन थांब्यावरील रस्त्यावर पुन्हा वाहतूक कोंडी होते. शहरात असे अघोषित असंख्य बसथांबे आहेत. धुळ्याकडून आलेल्या बसेस जुना आग्रा महामार्गावर दोन थांब्यांवर थांबतात. सटाण्याहून आलेल्या बसेस सटाणा नाका, लोढा मार्केट या दोन थांब्यावर थांबतात. नामपूरकडून आलेल्या बसेस रावळगाव नाका, कॅम्प रस्ता या भागात थांबतात. अशा सर्व अघोषित बसथांब्यांमुळे शहरातील या मुख्य रस्त्यांवर दिवसभरात अनेकदा वाहतूक कोंडी होते. कॅम्प रस्ता भागात दोन महिन्यात दोघांचे जीव गेले आहे. किरकोळ अपघात तर नेहमीच होतात. वाहनांच्या गर्दीमुळे वादाचे प्रसंग पाहावयास मिळतात. या रस्त्यांवरील काही थांब्यांवर प्रवाशांसाठी निवारा शेड आहे, त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शहरातील आगारातून येणाऱ्या-जाणाऱ्या या बसेसच्या वाहतुकीमुळे तसेच इतर लहानमोठी बेशिस्तीने जाणारी वाहने, वाहनांचा रस्त्यावरचा राबता यामुळे वाहतुकीची रस्त्यांवर होणारी कोंडी शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. (वार्ताहर)