इंडिगोचे विमान हैदराबादला पण प्रवाशांचे लगेज नाशिकलाच!
By संजय पाठक | Published: June 12, 2024 07:47 PM2024-06-12T19:47:33+5:302024-06-12T19:48:20+5:30
२४ तास उलटून गेल्यानंतरही लगेज आलेच नसल्याने प्रवाशांचा संताप
नाशिक : इंडिगो कंपनीच्या नाशिक- हैदराबाद सेवेचा लाभ घेतलेल्या सुमारे 30 ते 35 प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. काल नाशिकहून गेलेल्या हैदराबादला गेलेल्या विमान प्रवाशांचे लगेज (समान) विमानात नेले नसल्याने या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले काल विमानतळावर गोंधळ घातल्यानंतर आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व लगेज हैदराबाद येथे आणण्यात येईल असे आश्वासन इंडिगो कंपनीच्या वतीने देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आज 24 तास उलटून गेले तरी लगेज मिळालेले नाही तसेच इंडिगोच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या प्रवाशांशी संपर्क साधण्याचे सौजन्यही दाखवलेले नाही, त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
नाशिक- हैदराबाद ही इंडिगोची विमानसेवा काल दुपारी दोन वाजता होती. सुमारे 30 ते 35 प्रवासी नाशिकच्या ओझर विमानतळावरून बसले होते हवामान खराब असल्यामुळे विमान उड्डाणाला एक तास वेळ लागेल असे प्रवाशांना सांगण्यात आले त्यानुसार प्रवाशांनी प्रतीक्षा केली मात्र हैदराबाद येथे गेल्यावर त्यांचे लगेज आणण्यात आले नसल्याचे काही वेळाने सांगण्यात आल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. हवामान खराब असल्याने तांत्रिक कारणामुळे विमानामध्ये लगेज आणणे शक्य नव्हते असे कंपनीचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, यामुळे प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली अगोदरच या संदर्भात कल्पना दिली असती तर निम्मे प्रवासी नाशिकहून आलेच नसते असे या प्रवाशांनी सांगितले नाशिक येथील एक प्रवासी आणि भाजपाचे कार्यकर्ते नितीन वानखेडे यांनी यासंदर्भात नूतन नागरी उड्डाण मंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे.