एसटी महामंडळातून तिकीट होणार हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:42 AM2019-06-01T00:42:11+5:302019-06-01T00:44:15+5:30
एसटीची लालपरी म्हणून ज्याप्रमाणे बसची ओळख आहे. त्याप्रमाणेच एसटीच्या तिकिटाचीदेखील वेगळी ओळख आहे. आकड्यांच्या तिकिटापासून ते डिजिटल तिकिटापर्यंतचा प्रवास करणाऱ्या एसटीने आता पुढचे पाऊल टाकले आहे.
नाशिक : एसटीची लालपरी म्हणून ज्याप्रमाणे बसची ओळख आहे. त्याप्रमाणेच एसटीच्या तिकिटाचीदेखील वेगळी ओळख आहे. आकड्यांच्या तिकिटापासून ते डिजिटल तिकिटापर्यंतचा प्रवास करणाऱ्या एसटीने आता पुढचे पाऊल टाकले आहे. स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटीतून प्रवास करता येणार असल्याने काही दिवसात एसटीचे तिकीट हद्दपार होणार आहे. शनिवार (दि.१जून) पासून सदर कार्डसाठी नोंदणी केली जाणार आहे. गेल्या ७१ वर्षांपासून प्रवाशांच्या सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने काळानुरूप आपल्या सुविधा आणि सेवांमध्ये बदल करून प्रवाशांना अधिक सुखकर सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेतच आता महामंडळाने प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड आणले आहे. विविध प्रकारच्या प्रवासी सवलत घेणाºया प्रवाशांबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांनादेखील स्मार्ट कार्ड घेता येणार आहे. यासाठी त्यांना मोबाइलप्रमाणेच प्रवाशाला रिचार्ज मारावा लागणार असून, या कार्डच्या माध्यमातून तो कोणत्याही शहरातून आणि महामंडळाच्या कोणत्याही बसमधून प्रवास करू शकणार आहे. स्मार्ट कार्डमुळे सुट्ट्या पैशांचा निर्माण होणारा वाद टळणार आहेच शिवाय पैसे खिशात नसतील तेव्हा रिचार्ज केलेल्या कार्डच्या माध्यमातून त्याला प्रवास करणे सुलभ होणार आहे.
सदर स्मार्ट कार्ड योजनेतील मोठे लाभार्थी हे विद्यार्थीच आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या स्मार्ट कार्डचे रजिस्ट्रेशन केले जाणार आहे. या योजनेत नाशिक विभागातील सर्व आगारांतील मुख्य बसस्थानकावर विद्यार्थ्यांसाठा स्मार्ट कार्ड प्रणालीची नोंदणी केली जाणार आहे. सदरची नोंदणी झाल्यानंतर स्मार्ट कार्ड १० ते १५ दिवसांत प्राप्त होणार आहे.
नोंदणीकरण केलेल्या विद्यार्थ्यांनी पासची मागणी केल्यास त्या विद्यार्थ्यांस तात्पुरत्या स्वरूपाचा एक महिना मुदतीचा कागदी पास देण्यात येणार आहे. नवीन बसस्थानक, निमाणी, मालेगाव, मनमाड, सटाणा, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, लासलगाव, कळवण, पेठ, येवला आणि पिंपळगाव या आगारांमध्ये स्मार्ट कार्ड नोंदणी केली जाणार आहे.
लवकरच प्री-पेड सेवाही
राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या स्मार्ट कार्ड योजनेचा पुढचा टप्पा हा प्री-पेड कार्ड असणार आहे. यामध्ये प्रवाशाचे कार्ड हे त्याच्या बॅँक खात्याशी संलग्न केले जाणार आहे. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
४संबंधित प्रवासी हा सदर कार्ड कोणत्याही मार्गावर वापरू शकतो. कंडक्टरने कार्ड स्कॅन केल्यानंतर प्रवासी भाड्याची रक्कम संबंधिताच्या खात्यातून महामंडळाच्या खात्यात वर्ग होणार आहे.