पासपोर्ट आॅनलाइन अपॉइंटमेंट; लॉकडाऊनमुळे निर्बंध झाले शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 11:37 PM2020-07-17T23:37:43+5:302020-07-18T00:40:39+5:30
कोरोनामुळे अद्यापही अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन आहे, तर काही भाग कंटेन्मेंट झोन असल्याने अशा परिसरातील उमेदवारास अपॉइंटमेंट असतानाही ठरावीक तारखेला पासपोर्ट सेवा केंद्रात उपस्थित राहता येत नाही. सदर अडचण लक्षात घेऊन अशा उमेदवारांना आता पासपोर्ट अपॉइंटमेंटसाठी कितीदाही अर्ज करता येणार आहे.
नाशिक : कोरोनामुळे अद्यापही अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन आहे, तर काही भाग कंटेन्मेंट झोन असल्याने अशा परिसरातील उमेदवारास अपॉइंटमेंट असतानाही ठरावीक तारखेला पासपोर्ट सेवा केंद्रात उपस्थित राहता येत नाही. सदर अडचण लक्षात घेऊन अशा उमेदवारांना आता पासपोर्ट अपॉइंटमेंटसाठी कितीदाही अर्ज करता येणार आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अपॉइंटमेंट अर्जावरील निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. पासपोर्ट काढण्यासाठी देशभरातील पासपोर्ट कार्यालये तसेच त्यांच्या अंतर्गत उपनगरांमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र कार्यान्वित आहेत. पासपोर्ट काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर उमेदवाराला आपल्या शहरातील जवळील पासपोर्ट सेवा केंद्रात दिलेल्या तारखेनुसार कागदपत्रे जमा करण्यासाठी तसेच अन्य प्रक्रियेसाठी उपस्थित रहावे लागते; परंतु लॉकडाऊनमध्ये अनेक अर्जधारकांना दिलेल्या तारखेनुसार पासपोर्ट सेवा केंद्रात उपस्थित राहता आलेले नाही. आता अशा उमेदवारांसाठी अर्ज करण्याच्या मर्यादेत सूट देण्यात आली असून, उमेदवार कितीही वेळा आॅनलाइन अर्ज करू शकणार आहे. पासपोर्ट प्रक्रियेसाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर उमेदवारांना आपल्या शहरातील पासपोर्ट सेवा केंद्रात पुढील प्रक्रियेसाठी तारीख दिली जाते. काही अपरिहार्य काारणांमुळे जर उमेदवार संबंधित तारखेला उपस्थित राहू शकला नाही तर त्याला पुन्हा अपॉइंटमेंटसाठी आॅनलाइन अर्ज करावा लागतो. अशा प्रकारे तीनदा अर्ज करण्याची मुभा उमेदवाराला मिळते; परंतु लॉकडाऊनने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे उमेदवार पासपोर्ट सेवा केंद्रात पोहोचण्यास अनेक अडचणी येत असल्याने उमेदवाराला आता कितीदाही अर्ज करण्याची सवलत देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे तीनदा अर्ज करण्याची मर्यादा तूर्तास उठविण्यात आली आहे.
पासपोर्ट कार्यालयात जाताना उमेदवारांना मात्र सर्व काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सध्या पासपोर्ट कार्यालयात ३० टक्के इतकचे कर्मचारी असून, लॉकडाऊनच्या काळातील कामकाजात वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
कार्यालयात पोहोचता येत नसल्याच्या तक्रारी
नाशिकमधील पासपोर्ट सेवा केंद्रात दररोज जवळपास ३०० ते ४०० अपॉइंटमेंट केल्या जातात. मोठ्या शहरांमध्ये सदर संख्या दुप्पट आणि अनेकदा तीनपट असते; परंतु गेल्या मार्च महिन्यापासून लागू झालेला लॉकडाऊनचा कालावधी आणि अनलॉकनंतरही अनेक उमेदवार पासपोर्ट सेवा केंद्रात पोहोचत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे या उमेदवारांना संधी गमावावी लागू नये म्हणून आता उमेदवार जरी पोहोचू शकला नाही, तरी त्याला कितीदाही अपॉइंटमेंट घेता येणार आहे.
पासपोर्ट पोहोचत नसल्याच्या तक्रारींमुळे संबंधितांना प्रिंट काढून देणे, पोलिसांकडून आलेल्या आॅब्जेक्शननुसार पत्र काढणे आदी कामे सध्या सुरू आहेत.