करारनामा न करताच पेस्ट कंट्रोलचे कार्यादेश
By admin | Published: August 21, 2016 01:32 AM2016-08-21T01:32:11+5:302016-08-21T01:32:21+5:30
ठेकेदाराकडून काम सुरू : १९ कोटींचा ठेका पुन्हा वादात
नाशिक : महापालिकेत पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यावरून अजूनही कवित्व सुरूच असून, आरोग्याधिकाऱ्यांनी करारनामा न करताच संबंधित ठेकेदाराला कार्यादेश दिल्याचे उघड झाले आहे. सदर ठेकेदाराने गेल्या ८ आॅगस्टपासून काम सुरूही केले आहे. दरम्यान, मनसेचे स्थायी समिती सदस्य यशवंत निकुळे यांनी गेल्या सभेत सदर ठेकेदाराला मालेगाव महापालिकेने काळ्या यादीत टाकले असल्याचा आदेश सादर करूनही प्रशासनाकडून त्याबाबत काहीही कार्यवाही न झाल्याने सदरचा ठेका पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे आहेत.
डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत पेस्ट कंट्रोलसाठी तीन वर्षांकरिता निविदाप्रक्रिया राबविली होती. १९ कोटी ८० लाख रुपये खर्चाच्या या प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगत स्थायी समितीने सदरचा प्रस्ताव फेटाळून लावला होता व नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. परंतु गेडाम यांनी सदरचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असता शासनाने तो निलंबित केला. स्थायी समितीने सदर निलंबनाच्या निर्णयाविरोधी आपले अभिवेदन दिले असता शासनाने दि. १९ मे २०१६ रोजी स्थायीचा ठराव विखंडित करून संबंधित निविदाधारक मे. दिग्वीजय एंटरप्राईजेस यांना कार्यादेश देण्यासाठी आयुक्तांना अधिकार बहाल केले होते. त्यानुसार गेडाम यांनी शासन निर्णय व कायदेशीर अभिप्रायानंतर दि. २३ जून २०१६ रोजी मे. दिग्वीजय एंटरप्राईजेस यांना कार्यादेश व करारनामा करण्याचे आदेश आरोग्याधिकाऱ्यांना काढले. त्यानंतर ७ जुलै रोजी गेडाम यांची बदली झाली, तर २३ जूनचा सदर आदेश आरोग्य विभागाला ६ आॅगस्टला प्राप्त झाल्याचे सांगितले गेले. त्यानुसार, दि. ८ आॅगस्टपासून संबंधित ठेकेदाराला आरोग्य विभागाने काम करण्याचे आदेश काढले, परंतु त्याबाबतचा करारनामा अद्यापही केला नसून ४९ लाखांची बँक गॅरंटीही अद्याप घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. करारनामा न करताच ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आल्याने आणि संबंधित ठेकेदाराला मालेगाव महापालिकेने काळ्या यादीत टाकूनही नाशिक महापालिका प्रशासनाने काहीही दखल न घेतल्याने सदरचा ठेका पुन्हा वादात अडकण्याची चिन्हे दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)