बिबट्याचे दर्शन की अफवा : गवताच्या शेतात फिरविले ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 06:04 PM2020-06-30T18:04:56+5:302020-06-30T18:07:01+5:30
ट्रॅक्टरचालक सागर ताजनपुरे या युवकाला खबरदारीचा उपाय म्हणून वन्यप्राणी ‘रेस्क्य’ूचा संरक्षण सूट परिधान करण्यास सांगून शेतात ट्रॅक्टर फिरविला गेला. तरीदेखील बिबट्या नजरेस पडला नाही.
नाशिक : चेहडी शिवारातील बोरोडेमळा भागातून वनविभागाला बिबट्या नजरेस पडल्याची माहिती फोनवरून मिळते. नाशिक व बोरिवलीचे रेस्क्यू पथके लवाजम्यासहस घटनास्थळी पोहचतात. सुतळी बॉम्ब, अन् फटाक्यांची लड बांधावर लावली जाते; मळ्याभोवतालच्या घरांच्या गच्चीवरून वनक र्मचारी ‘ट्रॅन्क्यूलाईज गन’द्वारे बिबट्याला बेशुध्द करण्यासाठी निशाना धरतात; मात्र शेतात बिबट्याची हालचाल उशिरापर्यंत दिसून आली नाही. अखेर गवताच्या शेतात वनअधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ट्रॅक्टरसूध्दा फिरविण्यात आला; मात्र पदरी निराशाच आली.
सामनगावरोड शासकिय तंत्रिनकेतन समोरील बोराडे मळा भागातील सिध्दीविनायक कॉलनीतील काही नागरिक व महिलांना मंगळवारी (दि.३०) सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. ही माहिती वनविभागाला कळविण्यात आली. या ठिकाणी वनविभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी मोहीम हाती घेतली. मात्र बिबट्या शेवटपर्यंत आढळून आला नाही. बिबट्याने बोराडे मळ्यातून शेजारील पाडुरंग दौंड यांच्या शेतातील जनावरांच्या गीन्नी गवतात आश्रय घेतल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला. मोहिमेचा मोर्चा या शेताकडे वळविला गेला. सुमारे दोन तास या भागात प्रयत्न करण्यात आले. मात्र बिबट्या गवतामधून बाहेर आला नाही. अखेर येथील नागरिकांच्या मदतीने शेतातील गवातामध्ये ट्रॅक्टर फिरविण्याचा निर्णय वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी घेतला. ट्रॅक्टरचालक सागर ताजनपुरे या युवकाला खबरदारीचा उपाय म्हणून वन्यप्राणी ‘रेस्क्य’ूचा संरक्षण सूट परिधान करण्यास सांगून शेतात ट्रॅक्टर फिरविला गेला. तरीदेखील बिबट्या नजरेस पडला नाही. एकूणच बिबट्याची हुलकावणी दारणाकाठालगत सुरूच आहे. यामुळे बोराडे व दोंड मळ्यात बिबट्याचे दर्शन घडल्याचे वास्तव की अफवा याविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. वनविभागाकडून या भागात नागरिकांचे प्रबोधन करत जनजागृतीफर बॅनर लावण्यात आले. तसेच संध्याकाळी या भागातील नागरिकांनी आपली व लहान मुलांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहेत.