पाताळेश्वर विद्यालयातर्फे २०२ महिलांचा सन्मान
By admin | Published: March 8, 2016 11:04 PM2016-03-08T23:04:02+5:302016-03-08T23:11:02+5:30
जागतिक महिला दिन : सिन्नर महाविद्यालयात सक्षमीकरणावर व्याख्यान
सिन्नर : तालुक्यातील पाडळी व आशापूर येथील ग्रामपंचायत आणि पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त परिसरातील २०२ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
सिन्नरच्या नगराध्यक्ष श्रीमती आश्विनी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर नगरसेवक उज्ज्वला खालकर, अॅड. नीलिमा देशमुख,
अॅड. भाग्यश्री ओझा, सोनल बिन्नर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नम्रता क्षत्रिय, पाडळीच्या सरपंच निर्मला रेवगडे, आशापूरच्या सरपंच परिघा पाटोळे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पाडळी, आशापूर, बोगीरवाडी, हिवरे, लिंबाची वाडी, पिंपळे, ठाकरवाडी, पलाट, आडवाडी (मधली), दत्तवाडी, ठाणगाव या परिसरातील २०२ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
महिला सक्षम झाल्या तरच समाज सक्षम होणार असल्याचे मत नगराध्यक्ष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. पाडळी व आशापूर गावांमध्ये शौचालयांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. अॅड. देशमुख व ओझा यांनी महिलांचे हक्क व कायदे याबाबत माहिती दिली. डॉ. क्षत्रिय यांनी आहार, व्यायाम व अभ्यास या त्रिसूत्रीबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी सकस व पौष्टिक आहार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. अॅनिमिया, अशक्तपणा या आजारांवरील उपायांचीही त्यांनी यावेळी माहिती दिली.
सविता देशमुख यांनी प्रास्ताविकात जागतिक महिला दिन व स्त्री सक्षमीकरणाची माहिती दिली. श्रीमती एम. एम. शेख, पूजा पाटोळे, राधिका रेवगडे यांनी महिला दिनावरील कवितांचे वाचन केले. याप्रसंगी उल्का शिंदे, शकुंतला माळी, शीतल शिंदे, सीमा रेवगडे, सुमन रेवगडे, सिंधू पाटोळे, मीना पाटोळे, उषा पाटोळे आदिंसह सुमारे तीनशे महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी आभार मानले.
सिन्नर महाविद्यालय
सिन्नर : येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सिन्नर महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला सक्षमीकरण विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर डॉ. आशालता देवळीकर, श्रीमती एस. के. गायकवाड, श्रीमती एस. व्ही. कचरे, श्रीमती डी. एस. सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते. आजची पिढी विशिष्ट ध्येय्य समोर ठेवून वाटचाल करीत आहे. मात्र, ध्येयपूर्ती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात मोठा अडसर ताणतणावाचा असतो. त्यावर मात करण्यासाठी तणावमुक्त जीवन जगण्याची कला अवगत करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. देवळीकर यांनी यावेळी व्यक्त केले.
भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच प्रयत्नशील राहण्याचे आवाहन कृष्णाजी भगत यांनी
यावेळी केले. समस्या सोडविताना विद्यार्थ्यांनी सुसंवाद साधावा.
आपण ग्रामीण भागातील आहोत म्हणून मनात कमीपणाचा न्यूनगंड बाळगू नये. आपल्यातही असामान्य क्षमता आहेत, योग्य संधी
मिळाल्यास निश्चितपणे वेगळी छाप पाडण्याचा विश्वास बाळगण्याचे आवाहन प्राचार्य काळे यांनी यावेळी केले.
किरण उघाडे यांनी ‘महिलांची उंच भरारी’ या विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केले. याप्रसंगी श्रीमती एस. डी. यादव, नीलिमा पाटील, स्मिता शिंदे, श्रीमती ए. आर. पगार, श्रीमती व्ही. पी. मोगल आदि उपस्थित होते. जयश्री बागुल यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. (वार्ताहर)