गावठाणाच्या क्लस्टरचा मार्ग होणार मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 01:47 AM2019-09-17T01:47:21+5:302019-09-17T01:47:35+5:30
गावठाण भागाच्या पुनर्विकास करण्यासाठी महापलिकेच्या वतीने इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव अखेर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि. १७) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला असून, त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
नाशिक : गावठाण भागाच्या पुनर्विकास करण्यासाठी महापलिकेच्या वतीने इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव अखेर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि. १७) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला असून, त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन ते तीन दिवसांत कोणत्याही क्षणी आदर्श आचारसहिंता लागू होऊ शकते. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेत घाईघाईने स्थायी समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. त्यात गावठाण भागातील क्लस्टरशी संबंधित महत्त्वपूर्वी विषय चर्चेला येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून पावसाळ्यामुळे सतत पडझड होत असून, त्या पार्श्वभूमीवर गावठाण भागातील नागरिकांचे त्याकडे लक्ष लागून आहे.
महापालिकेचा शहर विकास आराखडा २०१७ मध्ये मंजूर झाला. यावेळी शहरातील २३ गावठाण वगळता अन्य भागांतील नियमावली मंजूर करण्यात आली होती. गावठाण भागातील जुन्या घरांच्या पुनर्विकासासाठी शासनाने क्लस्टर योजना आखण्यासाठी हा विषय बाजूला ठेवला होता. दरम्यान, शासनाने क्लस्टरचा प्रस्ताव तयार केल्यानंतर उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेच्या दरम्यान, गावठाण भागात ज्यादा एफएसआय दिल्यास लोकसंख्येची घनता वाढेल त्यामुळे त्याचा एकंदर सेवा सुविधांवर काय ताण होईल, याबाबत आघात मूल्यमापन केले पाहिजे, यासंदर्भात उच्च न्यायालयाने एका याचिकेत निर्णय दिले. त्यानुसार आघात मूल्यमापन करण्याचे आदेश गेल्यावर्षीच महापालिकेला देण्यात आले होते. त्यानुसार गेल्यावर्षी निविदा मागवण्यात आल्या होत्या. परंतु प्रतिसाद मिळाला नव्हता.
कोट्यवधींची औषध खरेदी
महापालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी लागणाºया औषधांसाठी खरेदीचा प्रस्तावदेखील स्थायी समितीच्या मंगळवारी (दि.१७) होणाºया सभेत मांडण्यात आला आहे. त्यामुळे औषध खरेदीचा निर्णयदेखील होणार आहे. त्याचप्रमाणे शरणपूर पालिका बाजार येथील लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाला वापरात असलेली जागा वाढीव भाड्यासह मुदतवाढीने देण्याचादेखील प्रस्ताव आहे.
महापालिकेने आता त्यासाठी सव्वादोन कोटी रुपये खर्च मंजूर करून निविदा काढल्या होत्या. त्याला चार निविदाधारकांनी प्रतिसाद दिला होता.
४क्रिसिल कंपनीची सर्वांत कमी म्हणजेच ६३ लाख ७५ हजार रुपयांची निविदा असून, ती मंजूर करण्याचा प्रस्ताव स्थायीच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे.