कुणाच्या पथ्यावर कुणाची बंडखोरी?

By किरण अग्रवाल | Published: June 17, 2018 01:47 AM2018-06-17T01:47:55+5:302018-06-17T01:47:55+5:30

शिक्षक मतदार-संघातील यंदाची निवडणूक थेट पक्षीय उमेदवारांच्या सहभागामुळे तर चर्चित ठरून गेली आहेच, शिवाय ‘टीडीएफ’ व भाजपातील बंडखोरीमुळेही तिला नवी परिमाणे लाभून गेली आहेत. अर्थात, ‘टीडीएफ’मध्ये नेत्यांची फाटाफूट झाल्याने उमेदवार वाढले; परंतु भाजपात तर स्वकीयानेच पक्षातील अंतर्गत खदखद यानिमित्ताने चव्हाट्यावर मांडली. त्यामुळे या पक्षाचीच अडचण वाढून गेली आहे. अशात उमेदवारांची वाढलेली संख्या व त्यातून पुढे येणारा जिल्हा-जिल्ह्यांच्या अस्मितेचा मुद्दा पाहता कुणाची बंडखोरी कुणाच्या पथ्यावर पडून जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

 On the path of someone's rebellion? | कुणाच्या पथ्यावर कुणाची बंडखोरी?

कुणाच्या पथ्यावर कुणाची बंडखोरी?

Next
ठळक मुद्देशिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता ब-यापैकी रंगात भाजपानेही स्वतंत्रपणे उमेदवार दिला शिक्षक उमेदवारांसोबत संस्थाचालक उमेदवार बनून पुढे आले

दुसऱ्यावर चढाई करायला निघतांना अगोदर घरातील आपले पाय घट्ट आहेत की नाही, याची खात्री करून घेणे हेच शहाणपणाचे ठरते. ते अन्य बाबतीत तपासले जात असले तरी, राजकारणात तशी तसदी अभावानेच घेतली जाते. भाजपा त्याला अपवाद कशी ठरावी? देशातील सर्व ठिकाणच्या राजकीय सत्ता जिंकायला निघालेल्या या पार्टीत होणा-या स्वकीयांच्या बंडाकडे म्हणूनच गांभीर्याने बघायला हवे. विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात आपल्याच शिक्षक परिषदेचे बोट सोडून रिंगणात उतरलेल्या भाजपानेही तशी तसदी घेतली नाही, त्यामुळेच या पक्षाला बंडखोरीस सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता ब-यापैकी रंगात आली आहे. यंदा या निवडणुकीत राजकीय पक्ष थेट रिंगणात उतरल्यामुळे तर रंग भरले आहेतच, शिवाय भाजपासह ‘टीडीएफ’ या प्रबळ शिक्षक संघटनेतही मोठ्या प्रमाणात बंडखोरी घडून आल्यानेही हे रंग अधिक गडद होऊन गेले आहेत. तसे पाहता १९८८ ते २००६पर्यंतच्या या मतदारसंघातील निवडणुका पाहता त्यात शिक्षक संघटनांचाच बोलबाला राहिल्याचा व त्यांचाच उमेदवार निवडून आल्याचा इतिहास राहिला आहे. मात्र गेल्यावेळी २०१२मध्ये अपक्ष उमेदवारी केलेले संस्थाचालक डॉ. अपूर्व हिरे निवडून आले, ज्यांना नंतर भाजपाने पुरस्कृत केले. आता यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा पाठिंबा लाभणारी शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व भाजपा पुरस्कृत शिक्षक परिषदेखेरीज, खुद्द भाजपानेही स्वतंत्रपणे उमेदवार दिला असून, भाजपाने उमेदवार दिला म्हटल्यावर शिवसेनेनेही त्यात उडी घेतली आहे. म्हणजे, शिक्षक संघटनांबरोबरच राजकीय पक्षही थेट स्वत:चे उमेदवार घेऊन निवडणूक लढत आहेत. स्वाभाविकच शिक्षक उमेदवारांसोबत संस्थाचालक उमेदवार बनून पुढे आले आहेत, त्यामुळे नाराजीला संधी मिळून गेली आहे. भाजपात तर त्यामुळेच बंड घडून आल्याने यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होऊन गेली आहे. कारण, शिक्षक मतदार असलेल्या या निवडणुकीत शिक्षकांचा कौल शिक्षक उमेदवाराला लाभतो, संस्थाचालकाला लाभतो की अन्य कुणाला, याची उत्सुकता सर्वांना आहे.
महत्त्वाचे म्हणजे, भाजपाने या निवडणुकीसाठी उधार-उसनवारी करीत अनिकेत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री विजय नवल पाटील यांचे सुपुत्र असलेल्या अनिकेत यांना भाजपाने उमेदवारी देणे हा त्यांच्या दृष्टीने भलेही बेरजेच्या राजकारणाचा भाग असेल; परंतु त्यानिमित्ताने या पक्षातील निष्ठावंत उमेदवाराची वानवा उघड होऊन गेली आहे. नाही तरी, सत्ता नसताना पक्षासाठी खस्ता खाणा-यांची आता पक्षात फारशी किंमत केली जात नसल्याचा संकेत महापालिका, जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येच मिळून गेला होता. त्यामुळे विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातही त्याचे प्रत्यंतर येण्यात वावगे वाटून घेता येऊ नये. मुद्दा आहे तो फक्त इतकाच, की अशी पर पक्षाच्या व्यक्तीला उमेदवारी देताना आपला कोणी दुखावणार तर नाही ना, याची काळजी घेतली गेली नाही. परिणामी प्रतापराव सोनवणे यांची बंडखोरी घडून आली. खरे तर, सोनवणे यांनाही पक्षाने कमी दिले नाही. भाजपातर्फे ते दोन वेळा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत गेले होते तर एकदा धुळे मतदारसंघातून लोकसभेत. पण, गेल्यावेळी सक्तीने त्यांना थांबावयास भाग पाडताना नंतर साधे तापी पाटबंधारे महामंडळही दिले गेले नाही. परिणामी पक्षांतर्गत उपेक्षेची त्यांची भावना तीव्र होत गेली व अखेर मुख्यमंत्र्यांनी विनंती करूनही त्यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली. त्यांच्या बंडखोरीचा भाजपा उमेदवारावर व एकूणच निवडणुकीतील मतांच्या फाटाफुटीवर काय परिणाम होईल हा भाग वेगळा, मात्र आमदार, खासदार राहिलेला ज्येष्ठ सदस्य, ज्याचा स्वत:चा एक मतदारवर्ग आहे तो आज प्रकृती तशी साथ देत नसतानाही सांजकालीन टप्प्यावर आपली आजवरची राजकीय पक्षनिष्ठा पणास लावून अशा पक्षाविरोधी निर्णयाप्रत येतो, हेच पुरेसे बोलके आहे. भाजपा जिकडे-तिकडे दिग्विजयाला निघाली असली तरी, ठिकठिकाणी त्यांच्या भ्रमाचे फुगे फुटत असतानाच, खुद्द त्यापक्षातील अंतस्थ स्थितीही आलबेल नसल्याचेच यातून अधोरेखित होणारे आहे, त्यामुळे उसनवारीच्या नेतृत्वावर या पक्षाला मैदान मारायचे आहे का, असा प्रश्न उपस्थित व्हावा.
भाजपातील बंडखोरी जशी खुद्द त्या पक्षासाठीच डोकेदुखीची ठरली आहे तशी ‘टीडीएफ’मधील फूटही या संघटनेसाठी अडचणीचीच ठरली आहे. शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे व काँग्रेस आघाडी समर्पित संदीप बेडसे या दोघांसह सुमारे अर्धा डझन उमेदवारांनी आपण ‘टीडीएफ’चे उमेदवार असल्याचा दावा केल्याने गुरुजींमधील संभ्रम वाढून गेला आहे. अध्यक्षाचा एक, तर कार्याध्यक्षाचा दुसराच उमेदवार असे हे चित्र आहे. शिवाय, जिल्हानिहायही वेगवेगळ्या उमेदवारांना संघटनेचे समर्थन सांगितले जाताना दिसत आहे. त्यामुळे यंदा निकराचा सामना होत असतानाच प्रादेशिक अस्मिता व फाटाफुटीतूनच विजयाची गणिते घडणार किंवा बिघडणार आहेत. अशा स्थितीत भाजपासारख्या पक्षाला स्वकीयाचे बंड शमवता आले असते तर ते त्यांनाच काहीसे लाभाचे ठरू शकले असते; पण तसे झाले नाही. म्हणजे, एक तर भाजपामुळे शिवसेना ईर्षेने रिंगणात उतरली आणि भाजपालाही आपल्याच्याच बंडखोरीने ग्रासले, असे भाजपानेच
यंदा या निवडणुकीत रंग भरून दिले आहेत. यातून गुरुजींची चंगळ होऊ घातली आहे कारण ‘पैसा’ बोलण्याची लक्षणे आहेत. तेव्हा अशा सवयींचा शिरस्ता घालून देणारी ही निवडणूक ‘काळ सोकावण्यास’ निमंत्रण देणारीच ठरूपाहात आहे, ते अधिक दुर्दैवी म्हणायला हवे.

Web Title:  On the path of someone's rebellion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.