पक्षासाठी विजयाचा मार्ग खडतर
By admin | Published: October 21, 2016 12:51 AM2016-10-21T00:51:11+5:302016-10-21T01:01:36+5:30
सटाणा पालिका निवडणूक : भाजपाच्या बैठकीत इच्छुकांमध्ये अस्वस्थता
सटाणा : शहरात भाजपाचे सर्वेसर्वा माजी नगराध्यक्ष स्वर्गीय अर्जुन अहिरे यांच्या काळात अनेक भरीव योजना राबवून सटाणा शहराचा कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला; मात्र तडजोडीचे राजकारण व नेतृत्वाच्या अभावामुळे कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ यामुळे अहिरेंच्या भरीव योजनांचे विस्मरण पडले. याचाच फायदा घेत विरोधकांनी तब्बल दहा वर्षं पालिकेची सत्ता भोगली. आजही पक्षाची हीच अवस्था राहिली तर विजयाचा मार्ग भाजपासाठी नक्कीच खडतर असा सूर आजच्या भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निघाल्याने इच्छुकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र आज बघायला मिळाले.
यावेळी जीवन सोनवणे, माजी तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे, मुन्ना शेख, महेश देवरे आदि कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेबद्दल जाहीर खंत व्यक्त केली. पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कै. अर्जुन अहिरे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले होते. अहिरे यांनी चिखलमुक्त शहर, टॅँकरमुक्त शहर, हरित शहर आदि संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणून शहराचा कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला; मात्र एवढे भरीव कार्य करूनही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी तडजोडीच्या राजकारणामुळे त्याचा ऊहापोह न केल्यामुळे दहा वर्षं सत्तेबाहेर राहण्याची किंमत पक्षाला मोजावी लागत आहे.
आजही तीच परिस्थिती असून, त्यात सुधारणा करून सक्षम उमेदवार न दिल्यास इजा बिजा तिजा होईल, असे यावेळी निदर्शनास आणून दिले. पक्षीय कार्यकर्त्यांचा हा सूर पाहून इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता बघायला मिळाली.
दरम्यान, यावेळी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले डॉ. संजय पाटील, डॉ. विलास बच्छाव, डॉ. प्रकाश जगताप, बाजार समितीचे सभापती रमेश देवरे, साहेबराव सोनवणे, बिंद शर्मा, सरोज चंद्रात्रे यांनी आपापल्या जमेच्या बाजू मांडून उमेदवारीसाठी दावेदारी केली. बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष दिनेश देवरे, आण्णासाहेब सावंत, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, नीलेश पाकळे, मंगेश खैरनार, श्रीधर कोठावदे, जगदीश मुंडावरे, पंकज ततार, मुन्ना शेख, शामकांत मराठे, अण्णा अहिरे, सुरेश धोंडगे, विकी सोनवणे, दिलीप सोनवणे, देवेंद्र जाधव, कुबेर जाधव, प्रकाश सांगळे, शामकांत लोखंडे, उषा जाधव, कल्पना पवार, रेणुका शर्मा, राजेंद्र सोनवणे, बबन सोनवणे, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)