पथसंचलनातून शहिदांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:14 AM2017-07-27T01:14:01+5:302017-07-27T01:14:17+5:30
नाशिक : तेरा अश्वपथक, १०० विद्यार्थ्यांचे ढोल पथक यांसह भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘कारगिल विजय दिनानिमित्त’ शिस्तबद्ध संचलन करून कारगिल युद्धातील शहिदांना मानवंदना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : तेरा अश्वपथक, १०० विद्यार्थ्यांचे ढोल पथक यांसह भोसला मिलिटरी स्कूलच्या हजारो विद्यार्थ्यांनी ‘कारगिल विजय दिनानिमित्त’ शिस्तबद्ध संचलन आणि शोक शस्त्र करून कारगिल युद्धातील शहिदांना मानवंदना दिली. गंगापूररोड येथील भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रांगणातील ‘अमर जवान’ ज्योतीजवळ संचलनाची सांगता करण्यात आली.
कारगिल विजय दिनानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलचे ७०० विद्यार्थी, भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्सच्या ३०० विद्यार्थिनी आणि भोसला मिलिटरी महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी शहरातील विविध भागांतून पथसंचलन करून देशभक्तीपर वातावरणाची निर्मिती केली. शहरातील विविध भागांतून काढण्यात आलेल्या संचलनाची सांगता भोसला मिलिटरी स्कूलमधील अमर जवान ज्योतीजवळ शहिदांना मानवंदना देऊन करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एनसीसी विंगचे कमांडर कर्नल व्ही. पी. चित्ते यांनी दहशतवाद, घुसखोरी आणि पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात पेटून उठलेल्या भारतीय लष्कराने कारगिल युद्धात विजय मिळविला. त्याचे स्मरण आपल्याला राहावे यासाठी ‘कारगिल विजय दिन’ साजरा केला जात असल्याची माहिती दिली तसेच भारतीय सैन्याच्या शौर्याची विविध उदाहरणे सांगितली. यावेळी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, नाशिक विभागाचे उपाध्यक्ष आशुतोष रहाळकर, कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, भोसला मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष अतुल पाटणकर यांच्यासह मंगला सवदीकर, नरेंद्र वाणी, स्मृती ठाकूर, शीतल देशपांडे, कमांडंट निवृत्त मेजर चंद्रसेन कुलथे, कमांडंट स्क्वार्डन सुप्रिया चित्रे, भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्सच्या मुख्याध्यापक डॉ. अंजली सक्सेना, भोसला मिलिटरी
स्कूलच्या मुख्याध्यापक चेतना गौर, भोसला प्राचार्य डॉ. सुचेता कोचरगावकर आदी उपस्थित होते. एनसीसी विद्यार्थी सहभागी होते.
शहरातील विविध भागांतून पथसंचलन
कॉलेजरोड येथील प्रिं. टी. ए. कुलकर्णी चौक, गंगापूररोड येथील शहीद चौक आणि पारिजातनगर बस स्थानक चौक याठिकाणीदेखील कारगिल चौकात शहीद झालेल्या सैनिकांना शोकशस्त्र करून अभिवादन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनीदेखील सहभागी होत शहीद जवानांना मानवंदना दिली.