पाथरेकरांचा विरोध कायम

By admin | Published: August 26, 2016 12:06 AM2016-08-26T00:06:53+5:302016-08-26T00:08:17+5:30

समृद्धी महामार्ग : सायाळे व वावीकरांच्या अटी, शर्ती

Pathrekar's opposition continued | पाथरेकरांचा विरोध कायम

पाथरेकरांचा विरोध कायम

Next


सिन्नर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी महसूल, रस्ते व विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील पाथरे, सायाळे व वावी येथे शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. पाथरे येथील शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास तीव्र विरोध करीत चर्चा करण्यास नकार देत बैठकीतून काढता पाय घेतला. सायाळे व वावी येथील शेतकऱ्यांनी भूसंचयन (लॅण्ड पुलिंग) न करता भूसंपादन करून एकरकमी मोबदला देण्याची मागणी करीत अनेक अटी व शर्ती मांडल्या.
भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता ए. एस. खैरे, नाशिकचे कार्यकारी अभियंता चिंतामण धोत्रे, अहमदनगरचे कार्यकारी अभियंता प्रभाकर भोईर, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, नायब तहसीलदार प्रशांत पाटील, लॅण्ड पुलिंग अधिकारी नामदेव जाधव यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाथरे, सायाळे व वावी येथे शेतकऱ्यांची बैठक घेतली.
प्रत्येक बैठकीत उपजिल्हाधिकारी सोनवणे यांनी भूसंचयन (लॅण्ड पुलिंग) चा शासन निर्णय वाचून दाखविला. लॅण्ड पुलिंगमुळे शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार आहेत, याची माहिती दिली. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय भूसंपादनाचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांचे जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत दहा बैठका घ्याव्या लागल्या तरी चालेल; मात्र एकतर्फी निर्णय घेतला जाणार नसल्याचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी वावी व सायाळे येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत सांगितले. यापूर्वी उपग्रहाद्वारे सर्व्हे करण्यात आल्याने काही गटक्रमांक चुकले असतील; मात्र आता ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या मोजणीला सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. जमीन भूसंचयन करण्याबाबतचे बंधपत्र जिल्हाधिकारी करून देणार आहेत. त्यामुळे फसवणूक होणार नाही, विश्वास ठेवा असे आवाहन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले.
भूसंचयन न करता भूसंपादन करून शेतकऱ्यांना एकरकमी मोबदला द्या, अशी मागणी सायाळे व वावी येथील बैठकीत शेतकऱ्यांनी केली. दोन लाख रुपये प्रतिगुंठा दराने जमिनीला भाव द्या, प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय नोकरी द्या, नोडमध्ये विकसित जमीन द्या, अशा अटी व शर्ती शेतकऱ्यांनी यावेळी मांडल्या. दुशिंगपूर येथील बंधाऱ्यासाठी यापूर्वी मोठी जमीन संपादित करण्यात आली आहे. सदर महामार्ग या बंधाऱ्यातून जात असल्याचे दिसते असे रामनाथ ढमाले यांनी सांगितले. शासन एकीकडे जलसमृद्धीसाठी योजना राबवित असताना या महामार्गासाठी सदर बंधारा बुजवणार का, असा संतप्त सवाल ढमाले यांनी उपस्थित केला. यावेळी अरुण भरीतकर, इलाहीबक्ष शेख, अ‍ॅड. प्रमोद ढमाले यांच्यासह शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडून प्रश्न उपस्थित केले.
वावी येथील बैठकीस संपत पठाडे, विठ्ठल उगले, मंदार केसकर, संतोष जोशी, बाबा कांदळकर, विजय गुरुळे, पवन भेंडाळे, चांगदेव ढमाले, नवनाथ घेगडमल, ज्ञानेश्वर लोंढे यांच्यासह दुशिंगपूर, कहांडवाडी, वावी व फुलेनगर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायाळे येथील बैठकीत शेतकऱ्यांनी भूसंचयन न करता भूसंपादन करा पण एकरकमी मोबदला द्या, अशी मागणी केली. यावेळी सरपंच पंडित चासकर, सुधाकर शिंदे, तुकाराम शिंदे, मलढोणचे शिवाजी हालवर, जगन शेंडगे, मच्छिंद्र शिंदे, तानाजी शिंदे यांच्यासह सायाळे व मलढोण येथील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Pathrekar's opposition continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.