गणेशपूरला बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन
By admin | Published: October 30, 2014 10:49 PM2014-10-30T22:49:45+5:302014-10-30T22:50:15+5:30
तरस असल्याचा निष्कर्ष : परिसरात घबराटीचे वातावरण
येवला : गणेशपूर परिसरात बुधवारी रात्री शेतकऱ्यांना रस्त्यावर बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते.
शेतकऱ्यांंना आढळलेला तो बिबट्या नसून तरस असल्याचा निष्कर्ष येवला परिक्षेत्राचे वनाधिकारी अशोक सोनवणे यांनी काढल्याने वातावरणातला तणाव काहीसा निवळला. बुधवारी रात्रीच्या सुमारास गणेशपूर परिसरातील शेतकरी रामभाऊ गायकवाड व त्यांचे सहकारी हे दोघे जण दुचाकीवरून चालले असताना त्यांना बिबट्यासदृश प्राणी आडवा झाला. त्यानंतर परिसरात बिबट्या आल्याची चर्चा सुरू झाली. ही खबर येवला परिक्षेत्राचे वनाधिकारी अशोक सोनवणे यांना ग्रामस्थांनी दिल्याने ते पथकासह गणेशपूर परिसरात दाखल झाले व बुधवारी रात्री शोधाशोध सुरू झाली. सरपंच जाधव व शेतकरी या शोध मोहिमेत सहभागी झाले. कपाशीच्या शेतामध्ये काही पाउलखुणा व संबधित प्राण्याची विष्ठा आढळली. त्यावरून परिसरात बिबट्या नसून तो तरस असल्याचे वनाधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे घबराटीचे वातावरण काहीसे निवळले. (वार्ताहर)