अपुऱ्या यंत्रणेवर रुग्णसेवेचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:07 AM2020-02-22T00:07:03+5:302020-02-22T01:17:22+5:30
महागडी यंत्रसामुग्री असतानाही केवळ तज्ज्ञ अधिकारी पूर्णवेळ उपलब्ध होत नसल्याने यंत्रणांचा रुग्णांसाठी सक्षम वापर होत नसल्याची बाब आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरोग्य उपसंचालकांना याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. कोणताही रुग्ण उपचाराविना राहता कामा नये यासाठी दक्षता घेण्याबाबतही त्यांनी सुनावले.
नाशिक : महागडी यंत्रसामुग्री असतानाही केवळ तज्ज्ञ अधिकारी पूर्णवेळ उपलब्ध होत नसल्याने यंत्रणांचा रुग्णांसाठी सक्षम वापर होत नसल्याची बाब आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरोग्य उपसंचालकांना याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. कोणताही रुग्ण उपचाराविना राहता कामा नये यासाठी दक्षता घेण्याबाबतही त्यांनी सुनावले.
राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. कर्करोगग्रस्तांवरील उपचारासाठी किरणोपचारासाठीची बंद असलेली यंत्रणा,सिटीस्कॅन, मुत्रपिंड प्रत्यारोपणाची यंत्रणा यासाठी तज्ज्ञ पूर्णवेळ अधिकारी नसल्याने रुग्णांना रुग्णालयाचा उपयोग रुग्णांना होत नसल्याची बाब चर्चेतून समोर आली. अत्याधुनिक यंत्रसामुग्री असली तर अनेक पदांना मान्यता देण्यात आली नसल्याने पूर्णवेळ तज्ज्ञ अधिकारी आणि तंत्रज्ञ उपलब्ध होत नलस्याने परिपूर्ण रुग्णालय असतानाही रुग्णांना सेवा मिळण्यास अडचणी निर्माण होऊ नये यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि सेवासुविधाबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्र्यांनी आरोग्य उपसंचालकांना दिले.
वैद्यकीय उपकरणांची घेतली माहिती यावेळी त्यांनी रुग्णांशीही संपर्क साधला. लाखो रुपये खर्च करून आणलेल्या यंत्रणेचा वापर रुग्णांसाठी झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी वर्षभरातील उपचाराचा आढावा घेतला. वैद्यकीय आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नामपल्ली यांच्याशी त्यांनी चर्चा केली. जिल्हा रुग्णालयातही आरोग्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयाची वाढीव क्षमता, आरोग्य यंत्रणा, तसेच रिक्त पदांबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडून माहिती घेतली.
बंद लिफ्ट आणि कार्यकर्त्यांची गर्दी
तीन मजली संदर्भ सेवा रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी ऐनवेळी लिफ्ट बंद पडल्याने मंत्री महोदयांना जिने चढून रुग्णालयातील अन्य कक्षांची माहिती घ्यावी लागली. काही कार्यकर्त्यांनीदेखील लिफ्टमधून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही धावपळ करीत पुन्हा जिने चढावे लागले.
तज्ज्ञ अधिकारी नियुक्तीबाबत चर्चा
विभागीय संदर्भसेवा रुग्णालयाच्या भेटीप्रसंगी आरोग्यमंत्र्यांनी येथील यंत्रणा चालविण्यासाठी तज्ज्ञ पूर्णवेळ अधिखारी, कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यासाठी आरोग्य उपसंचालकांशी चर्चा केली. लाखो रुपये खर्च करून आणलेल्या यंत्रणेचा वापर रुग्णांसाठी झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पदव्युत्तर महाविद्यालयाची तयारी सुरू
आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाबरोबरच जिल्हा रुग्णालयाबरोबरच सामंजस्य करार करून अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले प्रयत्न सुरू आहेत. लवकरात लवकर संलग्न वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता पूर्ण होईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. आरोग्य विद्यापीठाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालयाची उपयुक्तता लक्षात घेत राज्य शासनाने यासाठी पुढाकार घेतला आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.