दाभाडीच्या सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 09:50 PM2020-07-16T21:50:16+5:302020-07-17T00:06:02+5:30

मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागासाठी उभारण्यात आलेले दाभाडी येथील कोविड सेंटर हे पॉझिटिव्ह रुग्णांना अक्षरश: तुरुंगवास भोगत असल्याचा अनुभव देत असल्याचे वास्तव समोर आले आहे. महिला व पुरुष प्रसाधनगृह व शौचालय एकत्र ठेवण्याचा प्रताप या सेंटरने केला आहे.

Patient care at Dabhadi Center | दाभाडीच्या सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड

दाभाडीच्या सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड

Next

मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागासाठी उभारण्यात आलेले दाभाडी येथील कोविड सेंटर हे पॉझिटिव्ह रुग्णांना अक्षरश: तुरुंगवास भोगत असल्याचा अनुभव देत असल्याचे वास्तव समोर आले आहे. महिला व पुरुष प्रसाधनगृह व शौचालय एकत्र ठेवण्याचा प्रताप या सेंटरने केला आहे. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पॉझिटिव्ह रुग्णाची दररोज तपासणी करणे गरजेचे असताना येथे भ्रमणध्वनीवरून रुग्णांची विचारपूस करून जबाबदारी झटकण्याचे प्रकार घडत आहेत. रुग्णाच्या सुरक्षेसाठी बाहेर कोणीच उपलब्ध नसते. या सेंटरला निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. याठिकाणी स्वतंत्र बेडची व्यवस्था न करता मोडक्या-तोडक्या व अस्वच्छ बेडवरच रुग्णांची सोय करण्यात आली आहे. रुग्णांना वरण-भात दिला जातो. सायंकाळी व सकाळी मेनूमध्ये बदल केला जात नाही. आतापर्यंत या सेंटरवर सुमारे ७० ते ८० पॉझिटिव्ह व एक हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार केले गेले आहेत. सेंटरवर योग्य व चांगली सुविधा पुरवण्याचा दावा तालुका वैद्यकीय अधिकारी करत असले तरी रुग्णांची प्रचंड हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
देवळ्यात स्वच्छतागृहातच अस्वच्छता
देवळा तालुक्यात देवळा शहरातील विंचूर - प्रकाशा महामार्गावर असलेल्या जिल्हा परिषद विद्यानिकेतन विद्यालयात कोविड केअर सेंटर उभारलेले आहे. या सेंटरमध्ये रु ग्णांना चांगल्या सुविधा पुरविण्यात येत आहेत; परंतु कोविड सेंटरमधील स्वच्छतागृहाची नियमितपणे स्वच्छता करण्याची आवश्यकता असल्याचे रुग्णांनी सांगितले. येथील कोविड सेंटरमध्ये ८० खाटांची सोय करण्यात आलेली आहे. तीन रु ग्ण येथे उपचार घेत आहेत. देवळा शहर कोरोनामुक्त झाले आहे. देवळा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यानंतर देवळा मर्चण्ट बँकेने कोविड सेंटरमधील सर्व रुग्णांना नास्ता, अंडी व फळे पुरविण्याची जबाबदारी स्वीकारली असून, ती नियमितपणे सुरू आहे.

बाभुळगाव-नगरसूल केंद्रात हव्या सुविधा
येवला तालुक्यात बाभुळगाव येथे आयुर्वेद महाविद्यालय इमारतीत कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. मात्र, संस्थाचालकांनी जागा खाली करून मागितल्याने नंतर ते नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सद्यस्थितीत नगरसूल ग्रामीण रुग्णालय येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व बाभुळगाव येथील सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे कोविड केअर सेंटरअंतर्गत अलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. सद्यस्थितीला नगरसूल येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १५, तर बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षात तीन बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे.रुग्णांच्या मनोरंजनासाठी संगीत सुविधा उपलब्ध केली गेली असली तरी टीव्ही, खेळाचे साहित्य, वाचण्यासाठी वर्तमानपत्र, पुस्तके अशा अधिक सुविधांची गरज आहे. बाभुळगाव येथील कक्षात आंघोळीच्या गरम पाण्याची सोय आहे; मात्र बाधित रुग्ण वा संशयित रुग्णांसाठी पिण्यासाठी गरम पाण्याची सोय नाही.
अर्धवट शिजवलेले
बेचव भोजन

पिंपळगाव बसवंत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी वसतिगृहातील सेंटरमध्ये स्वच्छतेच्या तक्रारींबाबत लक्ष पुरविण्यात आले असले तरी भोजनाचा दर्जा राखण्यात अपयश आलेले दिसून येते. याठिकाणी रुग्णांना अर्धवट शिजवलेल्या बेचव भोजनाचा आस्वाद घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दाखल रुग्णांनी नाराजी बोलून दाखविली. याठिकाणी अजूनही डासांचे मोठे साम्राज्य आहे. त्यामुळे कोरोनाबरोबरच साथरोगाचीही लागण होण्याची भीती आहे.
कळवणला त्रिस्तरीय आरोग्य यंत्रणा
कळवण : मानूर येथील टेकडीच्या पायथ्याशी निसर्गाच्या सान्निध्यात आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात कोविड केअर सेंटर असून, तेथे रु ग्णांची तपासणी करून त्यांच्यात आढळलेल्या लक्षणांनुसार पुढील उपचार अभोणा येथे केले जात आहेत. अभोणा ग्रामीण रु ग्णालयात हे सेंटर असून, तेथे आॅक्सिजन, ईसीजीएस, एक्स-रे, रक्त-लघवी तपासणी व औषध आदी व्यवस्था आहे; मात्र ग्रामीण रु ग्णालय परिसर कंटेन्मेन्ट झोन घोषित केला असल्यामुळे हे सेंटर सध्या लॉकडाऊन झाले आहे. सेंटरच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता सध्या बंद अवस्थेत आहे. परिसरात नेहमीच स्वच्छता ठेवली जाते, शिवाय भोजनाच्याही व्यवस्थेबाबत रुग्ण समाधानी आहेत. मानूर येथील सीसीसीसाठी ३० बेड्सची उपलब्धता तर अभोणा येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसाठी २० बेडची व्यवस्था आहे. तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणा आणि तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी समन्वय करून यासंदर्भातील यंत्रणा सज्ज केली आहे. कोरोना कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत २९ रु ग्ण दाखल झाले आहेत.
सारतळेचे कोविड सेंटर असुविधाग्रस्त
नांदगाव/साकोरे : तालुक्याचे कोविड केअर सेंटर सारतळे (साकोरे) येथे नांदगाव शहरापासून सात किमी अंतरावर असून, सद्यस्थितीत येथे नऊ जणांना क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. चार महिने कोरोना रु ग्ण येथे राहिल्याने शाळेचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार अधीक्षक रवींद्र पाटील यांनी केली आहे. १२ वर्ग असलेल्या खालच्या मजल्यावर २२ बेड आहेत. पूर्ण क्षमतेने हे सेंटर वापरण्याची स्थिती आजपर्यंत निर्माण न झाल्याने येथील सुविधांमधील त्रुटी उघड्या पडल्या नाहीत.
सारतळेत राहण्याची व्यवस्था सुमार दर्जाची असून, खासगी विहीरमालकाने भीतीपोटी पाणी देण्याचे नाकारल्याने तीन महिने शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागला. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कर्मचारीवर्गाला त्यांची शक्ती खर्च करावी लागली. इमारतीच्या आजूबाजूला गवत वाढले आहे. संडास, बाथरूमाध्ये अस्वच्छता आहे. शासनाने कोविड सेंटर उभारणीसाठी जो निधी आरोग्य विभागाला दिला होता, त्याचा एक छदामही आश्रमशाळेत वापरला गेला नसल्याचा आरोप होत आहे.
 

 

Web Title: Patient care at Dabhadi Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक