उपचार न देताच रुग्णाला मिळाला ‘डिस्चार्ज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:13 AM2021-01-17T04:13:56+5:302021-01-17T04:13:56+5:30
वडाळा गावातील बाबुद्दीन खान व त्याचा भाऊ ताजुद्दीन खान हे दोघे तरुण टोळक्याच्या मारहाणीत जखमी झाले. बाबुद्दीनच्या तोंडाला मार ...
वडाळा गावातील बाबुद्दीन खान व त्याचा भाऊ ताजुद्दीन खान हे दोघे तरुण टोळक्याच्या मारहाणीत जखमी झाले. बाबुद्दीनच्या तोंडाला मार बसल्याने ओठ फुटले आणि डोक्याला मुका मार लागला. तर ताजुद्दीनला गंभीर स्वरूपाचा अंतर्गत मुका मार बसल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला पुरुष शल्य चिकित्सा कक्षात जागा नसल्याने थेट जळीत कक्षात उपचारार्थ दाखल करून घेतले गेले. यासोबत बाबुद्दीनलाही दाखल करून घेतले गेले; मात्र त्यास कुठल्याही प्रकारची तोंडाला पट्टी किंवा साधा कापसाचा बोळाही जखमेवर लावण्यात आला नाही; मात्र त्याच्या आंतररुग्ण पत्रिकेवर चक्क रात्रभरात पाच इंजेक्शन सलाइनद्वारे अन् काही गोळ्याही दिल्याची नोंद केली गेली. प्रत्यक्षात त्याला कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन, गोळ्या दिल्या गेल्या नाहीत. जेव्हा त्याच्या हातात डिस्चार्ज कार्ड पडले, तेव्हा त्या रुग्णाला मोठा धक्काच बसला. आपल्याला नेमके कधी ॲडमिट केले गेले अन् काय उपचार दिले, असे प्रश्न पडल्याने त्याने थेट जिल्हा शल्यचिकित्सकांचे दार ठोठावले. डॉ. रत्ना रावखंडे यांच्यापुढे त्याने आलेला अनुभव कथन केला असता त्यादेखील चक्रावून गेल्या. रुग्णाला उपचार न देता डिस्चार्ज देणे, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
--इन्फो--
इंजेक्शन गेले कोठे?
जर रुग्णालच्या उपचारपत्रकात पाच इंजेक्शन (टॅक्सिम, टी.टी, इमसेट, डायक्लो आदी) वापरल्याची नोंद करण्यात आली. तसेच रुग्णाच्या हातात दिलेल्या डिस्चार्ज कार्डावरसुद्धा तीन प्रकारच्या गोळ्या (तीन दिवसांच्या) दिल्याचे नमूद केले गेले; मात्र प्रत्यक्षात या रुग्णाला ना गोळ्या दिल्या गेल्या ना इंजेक्शन. त्यामुळे इंजेक्शन औषध भांडारातून घेतली गेली तर नेमकी गेली कोठे, असा प्रश्न उपस्थित होतो आणि जर इंजेक्शन घेतली गेली नाहीत, तर ती रुग्णाला दिली अशी बनावट नोंददेखील संबंधितांनी आंतररुग्ण पत्रिकेवर केल्याचे दिसून येते.
--कोट--
रुग्णाला उपचार न देता थेट गोळ्या-औषधे व इंजेक्शन वापरली गेल्याची लेखी नोंद करणे हे गैर आहे. त्यामुळे या प्रकरणी गंभीर दखल घेतली असून रुग्णाने दिलेल्या अर्जानुसार संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले असून तसा अहवालही मागविला आहे. डॉक्टरांकडून या रुग्णाच्या शरीराचे निरीक्षण केले असता कोठेही इंजेक्शन दिल्याचे ‘मार्क’ दिसून आले नाही.
- डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक