कसारा घाटात दरडी कोसळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:36+5:302021-07-20T04:11:36+5:30

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रविवारी (दि. १८) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या ...

Patients collapsed in Kasara Ghat | कसारा घाटात दरडी कोसळल्या

कसारा घाटात दरडी कोसळल्या

Next

नाशिक : गेल्या

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रविवारी (दि. १८) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या महामार्गावरील जुन्या कसारा घाटात दरड कोसळली, तर दुसरी घटना कसारा घाटातीलच जव्हारफाटाजवळ सोमवारी (दि. १९) पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान रेल्वे मार्गावर घडली. याठिकाणी रेल्वेमार्गावर झाड व दरड कोसळली. सुदैवाने दोन्ही घटनात जीवित हानी झाली नाही.

रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दगडी व मातीचा मलबा रस्त्यावर आल्याचे समजताच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी केशव नाईक व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन टीम या सामाजिक संस्थेचे सदस्य शाम धुमाळ, मनोज मोरे, अक्षय राठोड, विनोद आयरे, दत्ता वाताडे तसेच महामार्ग सुरक्षा पोलीस, घोटी केंद्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरड कोसळलेल्या ठिकाणी जाऊन नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना थांबवून रस्त्यावरील एक लेन सुरू करण्यात आली. कसारा पोलीस ठाण्याचे अधिकारी केशव नाईक व महामार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी अमोल वालझडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोल कंपनी यांच्याशी मदतीसाठी संपर्क केला. तब्बल दोन तासानंतर संबंधितांनी जेसीबी घटनास्थळी पाठवला. दरम्यान, रात्री ११ ते १ या वेळात भर पावसात पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी

नाशिककडे जाणारी वाहतूक विशेषतः लहान वाहनांची वाहतूक बॅटऱ्यांच्या (टॉर्च) साहाय्याने एक लेन संथ गतीने सुरू ठेवली. रात्री २ वाजण्याच्या दरम्यान संबंधित पिंक इन्फ्रा कंपनीचे कामगार आल्यानंतर मध्यरात्री २.४५ वाजता जेसीबीच्या मदतीने दरड हटवण्यात आली. यानंतर सर्व वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर नाशिक - मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटातही काही झाडे व माती रस्त्यावर आली होती. तीही बाजुला करण्यात आली.

इन्फो

रेल्वेमार्गावरही दरड कोसळली

कसारा घाटातील जव्हार फाटाजवळ सोमवारी (दि. १९) पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान रेल्वेच्या मार्गावरही झाड व दरड कोसळली. सुदैवाने दुर्घटना घडली नाही. घाटातील किलोमीटर क्रमांक १२२ / ३८वर महाकाय दरड, झाडे व मातीचा मलबा रेल्वे ट्रॅकवर कोसळला. घटनेची माहिती समजताच रेल्वेची आपत्कालीन सहायता टीम, रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत रेल्वे रुळावर पडलेले झाड, दरड व मातीचा ढिगारा बाजुला करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले. या दुर्घटनेमुळे अप व डाऊन मार्गाची रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. सर्व प्रकारच्या मेल व एक्स्प्रेस गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत होत्या. या घटनेमुळे डाऊन मार्गाच्या गाड्या मिडल मार्गावरून वळविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

इन्फो

दैव बलवत्तर.....

रविवार असल्याने कसारा - मुंबई - नाशिक महामार्गांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. जेव्हा घाटात महाकाय दरड कोसळली त्या दरम्यान मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे अनेक लहान वाहने घाटाखाली थांबून होती. पावसाचा जोर नसता अन लहान वाहने सुरू असती तर या महाकाय दरडीखाली एखादे वाहन सहज दडपले गेले असते. पण केवळ दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला.

फोटो - १९ कसारा घाट-२

कसारा घाटातील रेल्वे रुळावरील दरड व झाड मातीचा ढिगारा काढतांना रेल्वे कर्मचारी.

190721\19nsk_31_19072021_13.jpg

 फोटो - १९ कसारा घाट-२ कसारा घाटातील रेल्वे रुळावरील दरड व झाड मातीचा ढिगारा काढतांना रेल्वे कर्मचारी. 

Web Title: Patients collapsed in Kasara Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.