गृह विलगीकरणातील रुग्णांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:30 AM2020-12-13T04:30:15+5:302020-12-13T04:30:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत अशा कोरोनाबाधित रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय दिला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत अशा कोरोनाबाधित रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय दिला जातो. मात्र, बाधित असलेले व गृह विलगीकरणात असणारे अनेक जण कोणतीही बाधा नसल्याप्रमाणे सर्वत्र मुक्त संचार करीत असतात. गृह विलगीकरणातील या रुग्णांवरील यंत्रणेचे लक्ष खूपच कमी झाले असून, हे जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरू शकते.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असून, वाढती संख्या पाहता शासनाने ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत अशांना त्यांची इच्छा असल्यास गृह विलगीकरणात राहण्याची परवानगी दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच राहून या माध्यमातून उपचार घेतले जाऊ शकतात. काही लोक खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतात; मात्र हे करताना गृह विलगीकरण म्हणजे नेमके काय, याचे भान ते विसरून जातात. अनेकांना बाधा होत असून, त्यातील काही बाधित या बेशिस्त गृह विलगीकरणातील रुग्णांच्या संपर्कामुळेच झाले आहेत. सुरुवातीच्या काळात विलगीकरण आत ठेवल्यानंतर आरोग्य यंत्रणेकडून नियमित दर दिवसाला अशा लोकांचा आढावा घेतला जात होता. त्यांच्या घरावर विलगीकरणाचे ठप्पे लावले जात होते; परंतु आता यापैकी एकही यंत्रणा संबंधित रुग्ण खऱ्या अर्थाने विलगीकरणात आहे का, हे जाणून घेण्यासाठी कार्यरत असल्याचे दिसत नाही. केवळ दिवसभरात संबंधित रुग्णाला फोन करून त्याच्या आरोग्याबाबत माहिती घेतली जाते; मात्र त्यांचा वावर घराबाहेर नाही, याबाबत कुणीही खातरजमा करीत नाही. त्याचाच फायदा अनेक जण घेऊन सामान्य लोकांप्रमाणे व्यवहार करताना दिसत आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने प्रत्येकाचा आढावा घेणे रोज शक्य नसले तरीही दोन-तीन दिवसात हे शक्य होऊ शकते; मात्र आता यंत्रणादेखील सुस्तावल्याचे चित्र दिसून येत आहे.
इन्फो
९० टक्के नागरिकांचे घरीच उपचार
बाधित झाल्यानंतर घरीच राहून उपचार घेण्याचा पर्याय ९० टक्के बाधित निवडत आहेत; मात्र या रुग्णांवर आरोग्य यंत्रणेचे कितपत लक्ष आहे किंवा रुग्ण स्वतः इतर नागरिकांच्या आरोग्याबाबात विचार न करता बेशिस्तपणे सामान्य व्यक्तीप्रमाणे लोकांमध्ये वावरताना दिसतात. स्वतःचा आजार इतरांपासून लपवून इतर लोकांचे जीव धोक्यात टाकत आहेत.
--------------
इन्फो
कोरोनाचे प्रसारक
यंत्रणेला कदाचित हे शक्य नसेल; मात्र एक जागरूक नागरिक म्हणून बाधित झालेल्या प्रत्येकाने स्वतःची व समाजाची काळजी घेण्यासाठी ठरवून दिलेल्या दिवसांमध्ये स्वतःला घरी ठेवणे अत्यावश्यक आहे. बाधितांना स्वतःच्या कर्तव्याची जाणीव जर होत नसेल, तर हेच लोक आता कोरोनाचे प्रसारक ठरत असण्याची भीती आहे.
------------
जिल्ह्यातील आतापर्यंतचे एकूण रुग्ण - ९९,४०६
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ३,५३८
होम क्वारंटीन रुग्ण -
--------
कोट
जिल्ह्यातील रुग्णांमध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण खूप कमी झाले असल्याने रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचे प्रमाणदेखील अत्यल्प झाले असून, गृहविलगीकरणातील रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जे रुग्ण गृह विलगीकरणात आहेत, त्यांना नियमित फोनवरून संपर्क साधून औषधे तसेच तब्येतीबाबत चौकशी केली जाते.
डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी