किडनी विकाराचे वाढले रुग्ण
By admin | Published: March 9, 2017 01:52 AM2017-03-09T01:52:03+5:302017-03-09T01:52:03+5:30
जनसामान्यांमध्ये किडनी आजाराविषयी जनजागृती व्हावी तसेच दिवसेंदिवस वाढत चालणारा किडनी विकार नियंत्रणात यावा यासाठी ‘जागतिक किडनी दिन’ सर्वत्र साजरा केला जात आहे.
स्वप्निल जोशी नाशिक
जनसामान्यांमध्ये किडनी आजाराविषयी जनजागृती व्हावी तसेच दिवसेंदिवस वाढत चालणारा किडनी विकार नियंत्रणात यावा यासाठी ‘जागतिक किडनी दिन’ सर्वत्र साजरा केला जात आहे. ‘निरोगी जीवनशैलीसाठी किडनी निरोगी असायला हवी’ हे यावर्षीच्या किडनी दिनाचे घोषवाक्य आहे.
वाढत चाललेला स्थूलपणा, मधुमेह, रक्तदाब, व्यसनाधिनता यामुळे किडनी विकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब याबरोबरच वेदनाशामक औषधांच्या गैरवापरामुळेदेखील किडनी विकाराचा आलेख वाढतो आहे. ‘क्रोनिक किडनी डिसीज’ हा दीर्घकाळ राहणारा आणि वाढत जाणारा आजार असल्याने वेळेवर आणि लवकर उपचार केल्यास किडनी विकार आटोक्यात राहू शकतो. किडनीची कार्यक्षमता गरजेपेक्षा जास्त असल्याने सुरुवातीला लक्षणे लक्षात येत नाहीत आणि ५० टक्क्यांपेक्षा जास्त कार्यक्षमता मंदावल्यावर हा आजार लक्षात येतो.
यामध्ये किडनी विकार अखेरच्या टप्प्यावर असल्याने रुग्णाला डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपणाची आवश्यकता भासते. क्रोनिक किडनी फेल्युअर आजारात लक्षणे आणि त्यांचे प्रमाण प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळे असते. यामध्ये प्रामुख्याने सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर सूज येणे, पाय सुजणे, थकवा येणे अशक्तपणा येणे ही लक्षणे सुरुवातीला दिसतात. तसेच किडनीचा आजार बळावल्यानंतर अंगाला खाज येणे, शरीरातील हिमोग्लोबिन कमी होणे, झोप न येणे, स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिडेपणा वाढणे, झोपल्यावर दम लागणे आदि लक्षणे असू शकतात. या लक्षणांवरून किडनी निकामी असल्याची शंका आल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाणे हिताचे ठरेल तसेच चाळिशी नंतर वर्षातून किमान एकदा डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक आहे. नाशिक शहरात गेल्या पाच वर्षांत वीस टक्के नागरिकांना डायबेटिसमुळे किडनी निकामी झाल्याचे समोर आले आहे.