लासलगाव, येवल्यात आढळले म्युकरमायकोसिसचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:15 AM2021-05-13T04:15:28+5:302021-05-13T04:15:28+5:30
लासलगाव : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या म्युकरमायकोसिस या आजाराचे लासलगाव येथे सहा तर येवला येथे चार रुग्ण ...
लासलगाव : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या म्युकरमायकोसिस या आजाराचे लासलगाव येथे सहा तर येवला येथे चार रुग्ण तपासणीत आढळून आल्याची धक्कादायक माहिती लासलगावचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अविदत्त निरगुडे यांनी दिली.
सदर रुग्णांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथील नेत्ररोगतज्ज्ञांकडे उपचारांसाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
याबाबत डाॅ. अविदत्त निरगुडे यांनी सांगितले, म्युकरमायकोसिस म्हणजे डोळे, दात व नाक या ठिकाणी काळी बुरशीचे प्रमाण वाढणे होय. हा आजार झालेला रुग्ण फार क्वचितच औषधांना प्रतिसाद देतो, असे दिसून आले आहे. तसेच अवयवदेखील निकामी होऊन तो काढून टाकणे अपरिहार्य ठरते. यात रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होते. हा आजार शक्यतो किडनी, अवयव प्रत्यारोपण, मधुमेह व कोरोना उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना झालेल्या रुग्णांना उपचार घेताना जादा स्टेराॅईड दिले जाते. त्यामुळे रक्तशर्कराचे प्रमाण वाढते व प्रतिकारकशक्ती कमी होते. त्यामुळे पूर्ण झालेल्या व उपचाराने बरे झालेल्या रुग्णांनी या रोगापासून बचाव व्हावा म्हणून याबाबतची काही लक्षणे आढळल्यास तातडीने नेत्ररोगतज्ज्ञ ,नाक, कान, घसातज्ज्ञ, तसेच दंतचिकित्सा वैद्यकीय रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
इन्फो
अशी आहेत लक्षणे!
म्युकरमायकोसिसच्या लक्षणाबाबत डॉ. अविदत्त निरगुडे यांनी सांगितले, रुग्णाचे नाक दुखणे, डोळे दुखणे, नाक व तोंडाजवळ काळे ठिपके होणे, डोळे सुजणे, पापणी खाली पडणे, मोठ्या प्रमाणात डोके दुखणे, नाक व डोळ्याजवळ त्रास होणे अशी लक्षणे असून, अशी लक्षणे असल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी. परस्पर घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होताना नळी स्वच्छ असली पाहिजे तसेच ऑक्सिजन मशीनमध्ये साधे पाणी न वापरता डिस्टेलरी वॉटर वापरले पाहिजे, असे डॉ. निरगुडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.