पाटील, देसले यांचे अर्ज दाखल
By Admin | Published: January 17, 2017 01:17 AM2017-01-17T01:17:14+5:302017-01-17T01:34:06+5:30
पदवीधर निवडणूक : आज शेवटचा दिवस
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या अंतिम एक दिवस आधीपर्यंत अवघ्या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सोमवारी (दि.१६) भाजपाच्या वतीने डॉ. प्रशांत पाटील यांनी, तर माकपाच्या वतीने प्रकाश (राजू) देसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी भाजपाच्या वतीने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार डॉ. राहुल अहेर, आमदार अपूर्व हिरे, आमदार उदय पाडवी, संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत डॉ. प्रशांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच माकपाच्या वतीने राजू देसले यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी भाकपचे राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे, स्मिता पानसरे, सुनील मालुसरे, माकपा जिल्हासचिव व्ही. डी. धनवटे आदि उपस्थित होते. अपक्ष म्हणून महेश कडूस - पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी राकेश हांडे, प्रणव टोणपे, योगेश गुंड, शशिकांत अहिरे, चेतन पगार आदि उपस्थित होते. यापूर्वीच मनोज पवार (मालेगाव) व सुभाष डांगे (अहमदनगर) यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. सोमवारपर्यंत एकूण पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)