कारभारणीला सरपंच करण्यासाठी पतीराजांकडून मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:14 AM2021-02-10T04:14:35+5:302021-02-10T04:14:35+5:30
नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत वगळता परिसरातील २० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका चुरशीच्या व अटीतटीच्या झाल्या. ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच होणार असल्याने नवनिर्वाचित सदस्यांना ...
नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत वगळता परिसरातील २० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका चुरशीच्या व अटीतटीच्या झाल्या. ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच होणार असल्याने नवनिर्वाचित सदस्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष आरक्षणाकडे लागले होते. भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी, चापडगाव, धुळवड, दापूर, गोंदे, पाटोळे, खंबाळे, दातली, दोडी बुद्रुक, दोडी खुर्द, शिवाजीनगर, दत्तनगर, मानोरी, कणकोरी, निऱ्हाळे, सुरेगाव, मऱ्हळ बुद्रुक, मऱ्हळ खुर्द आदी ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक अटीतटीची होऊन अनेक ठिकाणी मातब्बरांना धक्का देत युवकांना मतदारांनी कौल दिला. ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर २८ जानेवारीला जात प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर झाले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला महिला आरक्षणही जाहीर झाल्याने साऱ्यांच्या नजरा परिसरातील सरपंचपदाकडे लागल्या आहेत.
सरपंचपदाच्या आरक्षणात बहुतांश ठिकाणी महिला सरपंचपदाचे आरक्षण निघाले आहेत. प्रामुख्याने नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी महिला) यामध्ये पाटोळे, मानोरी, कासारवाडी व मऱ्हळ बुद्रुक तसेच सर्वसाधारण महिलासांठी शिवाजीनगर, दत्तनगर, चापडगाव, सोनेवाडी, चास, सुरेगाव, कणकोरी, निऱ्हाळे-फत्तेपूर या गावांचा समावेश असून याठिकाणी सरपंचपदावर महिलांची वर्णी लागणार आहे. दोडी बुद्रुक येथील सरपंचपद अनुसूचित जाती या राखीव जागेसाठी असून या गटातून एकमेव महिला सदस्य निवडून आल्याने तेथेही महिला सरपंच होणार आहे. त्यामुळे परिसरातील तब्बल तेरा ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार आहे. त्यामुळे अनेक नवीन सदस्यांना उपसरपंचपदावर समाधान मानावे लागणार आहे. निवडणुकीत प्रत्येकाने उमेदवारी मिळविणे ते कारभारणीला विजयी करणे यासाठी केलेली धडपड अनुभवली आहे. आता सत्तेच्या खुर्चीत पत्नीला बसविण्यासाठी आडाखे बांधणे, त्यासाठी आपणच कसे योग्य आहोत, यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
इन्फो...
नवनिर्वाचित सदस्य सहलीला
सिन्नर तालुक्यात सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी काही कारणास्तव स्थगिती मिळाली असल्याने सरपंचपदाची दावेदारी असणाऱ्यांंचा जीव बुचकळ्यात पडला आहे. त्यामुळे आगामी काळात सरपंच व उपसरपंच निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून सदस्यांना सहलीला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांना धार्मिक स्थळांचे दर्शन होणार आहे. अनेक गावात सरपंचपद निश्चित आहे परंतु घोडेबाजार होऊ नये म्हणून सदस्यांची खबरदारी घेतली जात आहे.