विहिरीत पडलेल्या हरणास पाटोदेकरांनी दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:25 AM2019-04-22T01:25:18+5:302019-04-22T01:25:45+5:30
येथील आत्माराम महंत यांच्या विहिरीत पडलेल्या हरणास येथील रामेश्वर यात्रा कमिटीच्या नागरिकांनी रविवारी (दि.२१) दुपारी विहिरीतून बाहेर काढून व वैद्यकीय उपचार करून जीवदान दिले.
पाटोदा : येथील आत्माराम महंत यांच्या विहिरीत पडलेल्या हरणास येथील रामेश्वर यात्रा कमिटीच्या नागरिकांनी रविवारी (दि.२१) दुपारी विहिरीतून बाहेर काढून व वैद्यकीय उपचार करून जीवदान दिले.
अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आलेल्या हरणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला असता जखमी अवस्थेत या कुत्र्यांच्या तावडीतून आपली सुटका करून पळताना व पुढे विहिरीचा अंदाज न आल्याने हरीण विहिरीत पडले. सुदैवाने ही बाब यात्रेसाठी वस्त्यांवर वर्गणी गोळा करणाऱ्या महेश मेंगाणे, दत्तू पिंपरकर, गणेश बैरागी, सचिन मेंगाणे, भाऊसाहेब ढोपरे, वाल्मीक बोराडे या रामेश्वर यात्रा कमिटीच्या सदस्यांच्या लक्षात आली. त्यांनी विहिरीत पडलेल्या हरणास दोरी व खाटेच्या साहाय्याने बाहेर काढले व त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनवटे यांच्याकडून उपचार करून वनविभागाच्या ताब्यात दिले.
पाटोदा परिसरातील ठाणगाव, कानडी, विखरणी शिवारात वनविभागाचे हजारो हेक्टर जंगल असून, यात मोठ्या प्रमाणात वन्यजीव राहत आहेत. त्यात ससा हरीण, काळवीट, मोर यांचा समावेश आहे; मात्र यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत वनविभागाने या प्राण्यांसाठी जंगलात पाण्याची सोय न केल्याने सर्वच प्राणी अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीचा आसरा घेत आहेत. या भागात शेकडो मोकाट कुत्र्यांचे टोळके वावरत आहे. हे मोकाट कुत्रे या वन्यप्राण्यांवर हल्ला करीत असल्याने या प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत. त्यामुळे वनविभागाने या जंगलात प्राण्यांसाठी पाणवठे तयार करून पाण्याची सोय करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.