सावानाच्या आवारात बसणार पेव्हरब्लॉक
By admin | Published: December 4, 2014 12:23 AM2014-12-04T00:23:12+5:302014-12-04T00:23:23+5:30
कामाला सुरुवात : दीड वर्षानंतर लागला मुहूर्त; जेसीबीच्या साह्याने उखडले कॉँक्रिटीकरण
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीसह परशुराम साईखेडकर नाट्यगृहात अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी खोदण्यात आलेल्या आवारात आता पेव्हरब्लॉक बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, तब्बल दीड वर्षानंतर प्रत्यक्ष कामाला मुहूर्त लागला आहे.
शासनाने सार्वजनिक कामासाठी वापर होणाऱ्या वास्तूंना अग्निशमन यंत्रणा बसविणे बंधनकारक केल्यानंतर सार्वजनिक वाचनालयाने दोन वर्षांपूर्वी सुमारे ४० लाख रुपये खर्चून अग्निशमन यंत्रणा बसविली. त्यासाठी सार्वजनिक वाचनालयाच्या आवारासह प. सा. नाट्यगृहाचेही आवारात खोदकाम करण्यात आले. त्यासाठी कै. वा. गो. कुलकर्णी कलादालनाची वास्तूही पाडण्यात आली; मात्र अग्निशमन यंत्रणा बसवून दीड वर्षाचा कालावधी लोटला तरी वाचनालयाने खोदकामानंतर आवार कॉँक्रिटीकरणाला विलंब लावला. आवाराचे कॉँक्रिटीकरण करायचे की पेव्हरब्लॉक बसवायचे याबाबत सावानाच्या कार्यकारिणी मंडळात खल सुरू होता. काही पदाधिकाऱ्यांनी कॉँक्रिटीकरणाचा आग्रह धरला होता. त्यासाठी सुमारे २२ ते २५ लाख रुपये खर्चाचाही अंदाज काढण्यात आला होता; परंतु वाचनालयाने अगोदरच अग्निशमन यंत्रणेवर सुमारे ४० लाख रुपये खर्च केला असल्याने कॉँक्रिटीकरणासाठी आणखी लाखो रुपयांची झळ लागू नये, असे काही पदाधिकाऱ्यांचे मत होते.
हा खल करण्यातच दीड वर्षाचा कालावधी गेला. त्यातच सभासदांनी वाचनालयाकडे वारंवार तक्रारी करत वाचनालयाच्या आवाराची दुरुस्ती करण्याची मागणी लावून धरली होती. ज्येष्ठ सभासदांना खोदकाम केलेल्या आवारातून वाट काढणे मुश्कील बनते, अशी तक्रारही सभासदांची होती. अखेरीस वाचनालयाला मोठी आर्थिक तोशिस लागू न देता कमीत कमी खर्चात पेव्हरब्लॉक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि प्रत्यक्ष कामाला बुधवारपासून सुरुवात झाली. त्यानुसार वाचनालयाच्या प्रवेशद्वारावरील भिंत जेसीबीने पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)