हातपंप जर्जर, यंत्रणांना फुटेना पाझर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 04:53 PM2019-05-06T16:53:16+5:302019-05-06T16:53:26+5:30
कळवण तालुका : अनेक हातपंप नादुरुस्त, यंत्रणेचे दुर्लक्ष
मनोज देवरे
कळवण : तालुक्याच्या आदिवासी व ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी, यासाठी तालुक्यातील ठिकठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहे. हातपंप कोणत्या भागात लावायचा? त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात भूगर्भात पाण्याची सुविधा आहे का याची चाचपणी करु नच हातपंप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु पाणी पातळी खालावल्याने या हातपंपाकडे यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने त्यांची दुरावस्था झाली आहे. हातपंप जर्जर झाले असताना संबंधित यंत्रणांना पाझर फुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
कळवण तालुक्यात ५५० हातपंप व १३८ जलपऱ्या आहेत.ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेत ४१० हातपंपांचा करार झालेला आहे.त्यातील ३९८ पंप चालु असून २० हातपंप पाणीपातळी खालावल्याने बंद असल्याची माहिती समोर आली आहे. तर ग्रामपंचायती देखभाल दुरु स्ती करत नसल्याने अनेक हातपंप बंद पडले असल्याचे पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या यंत्रणेने सांगितले. उन्हाळ्यात ग्रामीण व आदिवासी भागातील, खेड्यापाड्यातील, वाडयावस्तीवरील सर्वसामान्य नागरीकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. महिलांना तर हंडाभर पाण्यासाठी पायपीटही करावी लागते.ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या बहुतांश हातपंपांचीही दुरवस्था झाल्याने तर कुठे पाणी पातळी खालावल्याने २० हातपंप बंद पडले आहेत.मे महिना सुरु झाला असून दिवसेंदिवस दाहकता वाढत आहे.अनेक गावातील पाणीपातळी खालावल्याने पाणीटंचाई जाणवत आहे.कळवण तालुक्यातील काही गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे.पाणीटंचाई दुर करण्यासाठी गेल्या काही वर्षात शासनाने टप्प्याटप्प्यात गाव,वाड्या,वस्त्यांवर विंधनविहिरी खोदुन त्यावर हातपंप बसवले आहेत.हे हातपंप सुरवातीच्या काळात योग्य पद्धतीने चालले.मात्र देखभाल दुरु स्तीअभावी अनेक पंप बंद पडले असुन त्यांचा वापर थांबल्याने पंप गंजले,तुटले आहेत