गोविंदाच्या गजरात पविते अर्पण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 01:00 AM2017-08-07T01:00:52+5:302017-08-07T01:00:58+5:30
राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या मायेच्या धाग्याचा आनंदमय सोहळा होय. या सणालाच नारळी पौर्णिमा, असेही म्हणतात. कोळी बांधवात हा सण सागराला नारळ अर्पण करून साजरा करतात. त्याचप्रमाणे महानुभाव पंथातदेखील गोविंदाच्या गजरात परमेश्वराला सूत गुंफलेले नारळ म्हणजे पविते अर्पण करण्याचा सण साजरा करण्यात येतो.
नाशिक : राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या मायेच्या धाग्याचा आनंदमय सोहळा होय. या सणालाच नारळी पौर्णिमा, असेही म्हणतात. कोळी बांधवात हा सण सागराला नारळ अर्पण करून साजरा करतात. त्याचप्रमाणे महानुभाव पंथातदेखील गोविंदाच्या गजरात परमेश्वराला सूत गुंफलेले नारळ म्हणजे पविते अर्पण करण्याचा सण साजरा करण्यात येतो.
दरम्यान, परमेश्वरबरोबर गुरूलादेखील पविते अर्पण करण्यात येते. यासाठी महानुभाव पंथीय श्रीकृष्ण व श्रीदत्त मंदिरात उत्साहाचे वातावरण असून, आकर्षक सजावट करण्यात येत आहे. नारळी पौर्णिमेच्या सणाला तसेच चतुर्दशीला महानुभाव पंथात पविते पर्व हा धार्मिक उत्सव साजरा करण्यात येतो. भगवान श्रीकृष्ण तथा पंचावतारांना सुताने गुंफलेल्या नारळाचे पविते अपर्ण करण्यात येते. जन्माष्टमीपर्यंत हा उत्सव तथा विधी सुरू असतो. यानिमित्त नारळी पौर्णिमेपासून ते जन्माष्टमीपर्यंत मंदिरात आणि आश्रमात आकर्षक सजावट करण्यात येते. तसेच उटी, उपहार, पूजा, भजन, कीर्तन आदि धार्मिक कार्यक्रम होतात. घरोघरीही देवघराची सजावट आणि आरास करण्यात येते.
नाशिक जिल्ह्यात महानुभाव पंथाची अनेक तीर्थस्थाने असून, यात कसबे सुकेणे तथा सुकदाणी बाबा आणि सिन्नर या तीर्थक्षेत्राचे महत्त्वाचे स्थान आहे. याठिकाणी चतुर्दशीला नारळी पौर्णिमेला देवाला पविते अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते तसेच नाशिक शहरात मोरवाडी येथील दत्तमंदिर, श्रीकृष्णमंदिर, गंगापूर गावातील दत्तमंदिर, आडगाव येथील श्रीकृ ष्णमंदिरातदेखील पविते पर्व विधी साजरा करण्यात येत आहे. सर्वच मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली असून, नारळी पौर्णिमेचा पूर्वसंध्येलाच भाविकांनी देवाला तसेच गुरुंना गोविंदाच्या गजरात पवते अर्पण केले.