शेतकरी आंदोलनात पवारांनी मध्यस्थी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:15 AM2021-01-23T04:15:46+5:302021-01-23T04:15:46+5:30
नाशिक : केंद्र सरकार कृषिविषयक कायदे दोन वर्षांसाठी स्थगित करायला तयार आहे. परंतु दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता ...
नाशिक : केंद्र सरकार कृषिविषयक कायदे दोन वर्षांसाठी स्थगित करायला तयार आहे. परंतु दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता राजकीय झाल्याची टीका करतानाच माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी कायद्याचा अभ्यास करावा, त्यांचा कृषिक्षेत्रातील अभ्यास मोठा असून, त्यांनी विरोध करण्याऐवजी आंदोलक आणि केंद्र सरकारमध्ये मध्यस्थी करावी, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (दि. २२) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्लीतील शेतकरी सरकारची भूमिका ऐकायला तयार असले तरी त्यांचे नेते तयार नसल्याने यावरून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे राजकारण केले जात असल्याची टीका करतानाच शेतकरी आंदोलनाचे राजकीय टुरिझम झाल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याचप्रमाणे अण्णा हजारे यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारच्या भूमिकेवर अण्णा हजारे यांनी विचार करणे आवश्यक असून, आपण याविषयावर अण्णांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संभाजीनगर नामकरणाला विरोध नसल्याचा पुनरुच्चार करतानाच विमानतळाला वेरूळ अजिंठा नाव देण्याची मागणीही त्यांनी केली. मुंबईतील सेंट्रल रेल्वे स्टेशनला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, चैत्यभूमी परिसराचा जीर्णोद्धार करावा आणि इंदू मिलचे काम पूर्ण करावे, अशा मागण्याही मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या खासदारांच्या चर्चेत केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, नाशिकमध्ये झालेल्या जातपडताळणी आंदोलनाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे सांगतानाच अर्णव गोस्वामी प्रकरणी दोषींवर कारावाई व्हायला हवी, असेही ते म्हणाले. दरम्यान, कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सुशीलकुमार यांची निवड झाली तर आनंदच आहे, असेही त्यांनी सांगितले.
इन्फो-
समुद्रात जाणारे पाणी शेतीला द्यावे
समुद्रात वाहून जाणारे पाणी रोखून शेतीला देण्याचे नियोजन करावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली असून, त्यासाठी केंद्र सरकारही मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे भूदान चळवळीत सरकारला मिळालेल्या जमिनी शिल्लक असतील त्या भूमिहीनांना देण्यात याव्यात त्यातून अनेक गरजूंना जोडधंदे करता येतील, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
इन्फो-
कोरोना लस जगात सर्वोत्कृष्ट
भारतात तयार झालेली कोरोना लस ही जगात सर्वोत्कृष्ट आहे. ही लस पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री घेणार आहे. ही कोरोना लस अत्यंत सुरक्षित असून, देशात दिलेल्या लसीचे कोणतेही निगेटिव्ह परिणाम दिसले नसल्याचे त्यांनी सांगितले.