पवार स्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड
By admin | Published: October 29, 2016 12:16 AM2016-10-29T00:16:16+5:302016-10-29T00:17:40+5:30
रायफल, पिस्तूल शूटिंग स्पर्धा : राज्य पातळीवरील स्पर्धेत दहा राज्यातील स्पर्धकांचा सहभाग
कळवण : मानूर येथील शरद पवार पब्लिक स्कूल येथे गेले दोन दिवस झालेल्या सीबीएसई बोर्डाच्या साऊथ झोन रायफल व पिस्तूल शूटिंग स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगना, केरळ, पॉण्डेचेरी, अंदमान निकोबार व लक्षद्वीप या विविध राज्यांतील शाळांचे रायफल व पिस्तूल शुटर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेतील विजयी खेळाडंूची वाराणसी येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यात शरद पवार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
शरद पवार पब्लिक स्कूल येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या साऊथ झोन एअर रायफल व पिस्तूल नेमबाजी (शूटिंग) स्पर्धेत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व गोवा या राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत शरद पवार पब्लिक स्कूलचे १४ ते १९ वर्षे वर्षाखालील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केल्याने त्यांची वाराणसी येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
शरद पवार पब्लिक स्कूलचा आदित्य पाटील या विद्यार्थ्याने १४ वर्षाखालील वयोगटात एअर पिस्तूल या खेळ प्रकारात द्वितीय व प्रतीक भामरे याने तृतीय स्थान प्राप्त केले. १९ वर्षाखालील वयोगटात एअर पिस्तूल या खेळ प्रकारात प्रसाद अहेर याने प्रथम स्थान प्राप्त केले. १९ वर्षांखालील वयोगटात पीप साईट एअर रायफल खेळ प्रकारात अक्षय पवार प्रथम व ओम कदम याने तृतीय स्थान प्राप्त केले. १७ वर्षाखालील एअर पिस्तूल वुमेन खेळ प्रकारात गौरी कामत (महाराष्ट्र) प्रथम, केतकी गोरे (महाराष्ट्र) द्वितीय व कस्तुरी गोरे (महाराष्ट्र) हिने तृतीय स्थान प्राप्त केले. १९ वर्षाखालील एअर पिस्तूल खेळ प्रकारात गुरू सिम्रण सिंग (कर्नाटक), द्वितीय व कु. भास्कर नाईन(केरळ) तृतीय स्थान प्राप्त केले. पीप साईट एअर रायफल मेन या खेळ प्रकारात डी. नेमिष (आंध्र प्रदेश) द्वितीय व पीप साईट एअर रायफल वुमेन, श्रुती देसिकन (केरळ) हिने प्रथम, प्रिया यादव (केरळ) द्वितीय व अनिकह अमिरीन (तामिळनाडू) स्थान प्राप्त केले. या सर्व यशस्वी विद्याथ्यांचा गुरुदत्त शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे. डी. पवार, सप्तशृंगी महिला बँकेच्या अध्यक्ष मीनाक्षी पवार, शैलेश पवार, अनुप पवार, विलास शिरोरे, गजानन सोनजे, बी. एन. शिंदे, जे. एल. पटेल, समन्वयक विश्वेशरण आदिंनी सत्कार केला. (वार्ताहर)