एनडीसी बँकेतील खातेदारांचे पैसे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 06:47 PM2020-12-23T18:47:34+5:302020-12-23T18:49:53+5:30
सुरगाणा : जिल्ह्यातील एनडीसी बँका पुर्ववत सुरू करून लाखो खातेदारांच्या खात्यात जमा असलेले कोट्यावधी रुपये परत देण्याची मागणी या बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सुरगाणा : जिल्ह्यातील एनडीसी बँका पुर्ववत सुरू करून लाखो खातेदारांच्या खात्यात जमा असलेले कोट्यावधी रुपये परत देण्याची मागणी या बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सुरगाणा शहरासह तालुक्यातील उंबरठाण, बाऱ्हे, बोरगाव याठिकाणी एनडीसी (जिल्हा बँक) बँकेत शेतकरी, नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच इतर खातेदारांच्या खात्यात कोट्यावधी रुपये नोटबंदीमुळे अडकून पडले आहेत. या बँकेतील व्यवहार कधीतरी सुरळीत चालू होतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. मात्र मोठा कालावधी उलटूनही व्यवहार सुरू झालेले नाहीत. त्यामुळे असंख्य खोतेधारकांना आर्थिकदृष्ट्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्हा बँकेच्या सुरगाणा, बाऱ्हे, उंबरठाण व बोरगाव येथील शाखांमध्ये तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर, धान्य खरेदी महामंडळ, महिला बचत गट, बँक कर्मचारी, सर्व ग्रामपंचायतमधील नागरीक, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी आदींच्या रकमा अडकल्या आहेत. ह्या परिस्थितीस जबाबदार असणाऱ्या बँकेच्या भोंगळ कारभारामुळे ही बँक बंद असल्यामुळे सन २०१५ - १६ पासून खातेदारांना निराशेने ग्रासले आहे. येत्या सात दिवसांत ठेवीदारांचे रुपये न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिंतामण गावित यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबतचे निवेदन एनडीसी बॅ॑केचे व्यवस्थापकीय संचालक, तहसिलदार, आमदार नितीन पवार, पोलिस ठाणे आदींना देण्यात आले आहे. या निवेदनावर अशोक आहेर, राजू पवार, नवसु गायकवाड, माधव पवार, तुकाराम देशमुख, रघुनाथ जाधव, मोहन गांगोडे यांचेसह अनेक खातेदारांची स्वाक्षरी आहेत.
नोटबंदीनंतर गेल्या चार वर्षांपासून सर्व खातेदारांच्या खात्यात जमा असलेले त्यांचे कोट्यावधी रुपये मिळाले नाहीत. त्यामुळे सर्वांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येत्या सात दिवसांत खातेदारांचे रुपये न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी संपूर्णपणे जिल्हा बँक व प्रशासनाची राहील.
- चिंतामण गावित, माजी उपाध्यक्ष, जिल्हा बँक.
० सुरगाणा तालुक्यातील १९५ सेवानिवृत्त कर्मचारींचे एक कोटी बारा लाख रुपये अडकलेत.
० नाशिक जिल्हा मजूर सहकारी संघाचे संपूर्ण जिल्ह्यात सव्वा सात कोटी रुपये अडकले आहेत.
० शेतकरी व नोकरदार वर्गाचे तसेच इतर खातेदारांचे कोट्यावधी रुपये या जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये अडकलेले आहेत.