दंड भरू, पण बाहेर फिरू; विनाकारण फिरणारे २३७ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:14 AM2021-05-26T04:14:46+5:302021-05-26T04:14:46+5:30
नाशिकमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कोरेाना बाधितांची संख्या वाढू लागली. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस आयुक्तांनी एकाच वेळी निर्बंध घालणे ...
नाशिकमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कोरेाना बाधितांची संख्या वाढू लागली. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस आयुक्तांनी एकाच वेळी निर्बंध घालणे सुरू केले. बाजारपेठा सकाळच्या सत्रात सुरू ठेवल्या, तसेच लग्न सोहळे बंद केले. खासगी कार्यालये, शिक्षण संस्था बंद झाल्या. मात्र यानंतरही रस्त्यावरील गर्दी ओसरली नाही. त्यामुळे महापालिका आणि पोलिसांनी रस्त्यावर अकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतानाच ॲंटिजेन चाचण्या करण्याचे ठरवले. पोलीसांच्या मदतीला एक शिक्षक आणि एक वैद्यकीय कर्मचारी देऊन चाचण्या सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला पंचवटी आणि नाशिकरोड भागात नागरिकांना पकडून महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तेथे चाचण्या करण्यात आल्या. मात्र, त्यानंतर रस्त्यावरच चाचण्या सुरू केल्या. परंतु त्यानंतरही रस्त्यावरील गर्दी कमी झाली नाही. दंड भरू पण बाहेर फिरू अशीच प्रवृत्ती वाढीस लागली आहे.
इन्फो....
कारणे तीच कोणाचा दवाखाना, तर कोणाचा भाजीपाला
- निर्बंध काळात अत्यावश्यक सेवेतील किंवा वैद्यकीय कारणांसाठी बाहेर पडणाऱ्यांनाच परवानगी आहे. मात्र असे असले तरी नागरिक वेगवेगळी कारणे सांगून बाहेर पडत आहे.
- दवाखान्यात जायचे आहे, पेशंट ॲडमिट आहे, लस घेण्यासाठी चाललोय अशी तीच ती कारणे नागरिकांनी दिली.
- जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी म्हणजेच किराणा, भाजीपाला, लहान मुलांसाठी दूध, औषधे करण्यासाठी बाहेर पडल्याची कारणे नेहमीच सांगण्यात आली.
इन्फो..
शहरात २० ठिकाणी तपासणी
महापालिका आणि पोलिसांनी रहदारीच्या मार्गांवर सुमारे आठ ठिकाणी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची चाचणी केली. यात मुंबई नाका, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, सारडा सर्कल, शिवाजी वाडी, वडाळा गाव, कलानगर, पांडवनगरी, पाथर्डी फाटा, बोधलेनगर, अशोका सिग्नल, चांडक सर्कल, जेहान सर्कल तसेच एबीबी सर्कल यांसह सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी अशा एकूण वीस ठिकाणी नागरिकांची तपासणी करण्यात आली.
इन्फो...
२,२१,०४९
कोरोनाचे एकूण रुग्ण
२,१३,६०४
एकूण कोरोनामुक्त
५२२८
रिकाम टेकड्यांची केली चाचणी
२३७
आलेले पॉझिटिव्ह