जादा कामाचे द्या दाम
By admin | Published: August 20, 2016 12:42 AM2016-08-20T00:42:36+5:302016-08-20T00:43:48+5:30
महापालिका : म्युनिसिपल कर्मचारी सेनेची मागणी
नाशिक : महापालिकेच्या कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत असताना बहुतेक खातेप्रमुख कुठलेही लेखी आदेश न देता त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत थांबवून जादा स्वरूपाचे कामकाज करून घेत असतात. त्यामुळे जादा कामाचा जादा मोबदला देण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेने आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिकेचे कामकाज सायंकाळी ६ वाजेपर्यंत आटोपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांना थांबवून घेत त्यांच्याकडून जादा काम करून घेण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. गेल्या दीड वर्षात तर कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत महापालिकेत थांबवून घेतल्या गेल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे संघटनेने यापुढे कर्मचाऱ्यांना जादा मोबदला देण्याची मागणी केली आहे. याशिवाय, महापालिकेत गेल्या तीन वर्षांपासून पदोन्नती कमिटीची एकही बैठक झाली नसल्याने पदोन्नत्या थांबल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून सेवाज्येष्ठता यादीदेखील प्रसिद्ध झालेली नाही. बहुतेक कर्मचाऱ्यांना कुंठीत वेतनश्रेणी देण्यात आलेली नाही. शिक्षण मंडळावरील १६ सुरक्षा रक्षकांना कायम वेतनश्रेणीवर सामावून घ्यावे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून कर्मचाऱ्यांना गणवेश, रेनकोट व गमबूट मिळालेले नाहीत. कर्मचाऱ्यांना गृहकर्ज व वाहनकर्ज मिळावे, मनपा दवाखान्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांना घाणभत्ता मिळत नाही. तो त्वरित द्यावा. रिक्त पदे तातडीने भरावीत, अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात दहा टक्के वाढ करावी आदि मागण्या संघटनेने आयुक्तांकडे केल्या आहेत. (प्रतिनिधी)